पुण्यातील कुख्यात घायवळ टोळीतील मोक्का गुन्ह्यातील 2 फरार आरोपी कोल्हापूर-अहिल्यानगरमधून ताब्यात; एलसीबीची कारवाई
अहिल्यानगर, 21 जून 2026: पुणे शहरासह राज्यात खंडणी व संघटित गुन्ह्यांसाठी कुख्यात असलेल्या घायवळ टोळीतील मोक्का गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने कोल्हापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
व्हॉट्सऍपवरून 20 लाखांची खंडणी
प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की, फिर्यादी श्री विजयसिंह कल्याणराव गोलेकर वय 45 वर्षे, रा. सुर्वेवाडी, खर्डा ता. जामखेड हे दिनांक 12/05/2026 रोजी खर्डा येथे असताना इसम रोहित उर्फ बबलू बाबासाहेब गोलेकर रा. खर्डा याने फिर्यादीच्या मोबाईल क्रमांक 9422202221 च्या व्हॉटसऍपवर मोबाईल नंबर 8999200386 वरून फोन करून धमकी दिली. पुणे येथे दाखल झालेल्या संघटीत गुन्हेगारीच्या गुन्ह्यात तू मला वाचविले नाही, तुझ्यामुळे माझे वाटोळे झाले व 20 लाख रुपये खर्च झाला, असे म्हणत तुला वाचायचे असेल तर 20 लाख रुपये खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास गोळ्या घालून मारण्याची धमकी देत शिवीगाळ, दमदाटी केली.
सदर घटनेबाबत फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस स्टेशन गु.र.नं. 79/2026 भा.न्या.सं. कलम 308(5), 351(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोल्हापूर व मिरजगावमधून अटक
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, राहुल डोके, अमोल आजबे, मनोज साखरे, प्रशांत राठोड, सतिष भवर, चालक महादेव भांड यांच्या पथकाने तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून आरोपी रोहित उर्फ बबलू गोलेकर हा शहापूर पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर हद्दीतील यड्राव फाटा परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. दिनांक 21/06/2026 रोजी पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्याचप्रमाणे मिळालेल्या माहितीवरून कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर अभिलेखावरील फरार आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली दगडू तोंडे वय 40 वर्षे, रा. खेचरे, ता. मुळशी हा मिरजगाव गावच्या शिवारातील सोलापूर ते अहिल्यानगर जाणाऱ्या महामार्गावरील उड्डाणपुलाखाली थांबलेला असल्याची माहिती मिळाली. त्याला तेथून ताब्यात घेण्यात आले.
13 गंभीर गुन्ह्यांचा रेकॉर्ड
आरोपी रोहित उर्फ बबलू बाबासाहेब गोलेकर हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. त्यात वारजे माळवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. 417/2025 व कोथरुड पोलीस ठाणे गु.र.नं. 277/2025 चा समावेश आहे. या गुन्ह्यांमध्ये भा.न्या.सं. कलम 308(4), 308(5), 351 सह मोक्का कायदा 1999 कलम 3(1)(ii), 3(2), 3(4) चा समावेश आहे.
आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली दगडू तोंडे याच्याविरुद्ध एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. त्यात कोथरुड पोलीस ठाणे गु.र.नं. 277/2025 व 325/2025 चा समावेश आहे. या गुन्ह्यांमध्ये मोक्का कायदा व आर्म अॅक्ट कलम 3/25 चा समावेश आहे.
दोन्ही आरोपी पुणे येथील कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित आहेत.
पुढील तपासासाठी ताब्यात
आरोपी रोहित उर्फ बबलू गोलेकर याच्याविरुद्ध अहिल्यानगर जिल्ह्यातील खर्डा पोलीस स्टेशन येथे गुन्हा तपासावर असल्याने त्याला पुढील तपासकामी खर्डा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली तोंडे याला पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील वरील पोलीस अधिकाऱ्यांनी केली.


