बंद झालेली बससेवा पुन्हा सुरू;पारनेर-कुर्ला एसटी सेवा पूर्ववत

पारनेर-कुर्ला एसटी सेवा पूर्ववत

खा. नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश

प्रवाशांकडून कृतज्ञतेची भावना व्यक्त

कोरोनानंतर बंद झालेली बससेवा पुन्हा सुरू; ग्रामीण भागातील मुंबईकरांना मोठा दिलासा

पारनेर : प्रतिनिधी

कोरोना काळापासून बंद असलेली पारनेर ते कुर्ला-नेहरूनगर ही महत्त्वाची एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून, खासदार नीलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे खा. लंके यांनी केलेल्या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ही सेवा पूर्ववत सुरू केली आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यासह मार्गावरील अनेक गावांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईत नोकरी, व्यवसाय व विविध कारणांनी स्थायिक झालेल्या हजारो नागरिकांसाठी ही बससेवा जीवनवाहिनी मानली जात होती. मात्र कोरोना काळात ही सेवा बंद करण्यात आल्यानंतर नागरिकांना गावाकडे ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकांना कल्याण किंवा पुणे येथे उतरून पुढील प्रवासासाठी अन्य वाहतुकीचा आधार घ्यावा लागत होता.

गावागावांतील नागरिकांची गैरसोय

पारनेर डेपो अंतर्गत चालणारी ही बस पारनेर, लोणी हवेली, जामगाव, भाळवणी, माळकूप, हिवरे कोरडा, गोरेगाव, कान्हूर पठार, पिंपळगाव रोठा, नांदूर पठार, आणे, बेल्हे, राजुरी, आळेफाटा, ओतूर, मढ, पारगाव, माळशेज, मुरबाड, कल्याण मार्गे कुर्ला-नेहरूनगरपर्यंत धावत होती. या मार्गावरील अनेक गावांतील नागरिक मुंबईत वास्तव्यास असल्याने त्यांच्यासाठी ही सेवा अत्यंत सोयीची ठरत होती. बससेवा बंद झाल्यानंतर नागरिकांनी विविध स्तरांवर मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेऊन खासदार नीलेश लंके यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सविस्तर पत्र पाठवून सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती.

खा. लंके यांच्या पत्राची दखल

परिवहन मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात खा. लंके यांनी या बससेवेचे महत्त्व अधोरेखित करत मार्गावरील नागरिकांची होणारी गैरसोय निदर्शनास आणून दिली होती. मुंबईत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना गावाकडे येण्यासाठी थेट वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन सेवा पूर्ववत सुरू करण्याची विनंतीही केली होती.

प्रवाशांकडून आनंद

एसटी सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर पारनेर तालुक्यासह मार्गावरील गावांतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. विशेषतः मुंबईत राहणाऱ्या कुटुंबांना आता थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने वेळ व खर्चाची बचत होणार आहे. अनेक प्रवाशांनी खासदार नीलेश लंके यांनी नागरिकांच्या प्रश्नाची दखल घेत प्रभावी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

ग्रामीण भागाला मुंबईशी जोडणारा दुवा

पारनेर ते कुर्ला-नेहरूनगर ही बस सेवा केवळ प्रवासाचे साधन नसून ग्रामीण भाग आणि मुंबई यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानली जाते. सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे तालुक्यातील विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles