दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंध्र प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीच्या सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेने पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाच्या पायथ्याशी जेरबंद केले. आरोपींकडून पिकअप वाहन, पाच मोबाईल, लोखंडी कत्ती, कटावणी आणि मिरची पूड असा 10 लाख 48 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या टोळीने मागील काही दिवसांत पैठण, पाथर्डी आणि राहाता परिसरातून गाढवांची चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील दरोडा व जबरी चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक जिल्ह्यात पेट्रोलिंग करीत होते. 21 ऑगस्ट रोजी पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना पाथर्डी-अहिल्यानगर रोडवरील करंजी घाटाच्या पायथ्याशी एका पांढऱ्या रंगाच्या पिकअपजवळ 5 ते 6 जण संशयास्पदरीत्या थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पिकअपजवळ सहा जण आढळून आले. त्यांच्या हालचालींबाबत समाधानकारक माहिती न मिळाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये साईकुमार लक्ष्मीनारायण पालपत्ती (वय 26), यशबाबु व्यंकटेश मोगिली (45), सुधाकर भास्करराव देवारकोडा (42), अंजी श्रीनु कुमाकुला (27), नागेश वेंकटेश पेनड्रा (42) आणि सतीष नागेश्वराव पालेपु (36) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडून पाच मोबाईल, 10 लाख रुपये किमतीचे महिंद्रा पिकअप वाहन (क्र. एपी 39 युडी 1416), लोखंडी कत्ती, लोखंडी कटावणी आणि मिरची पूड असा एकूण 10 लाख 48 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी दरोडा घालण्याच्या तयारीत आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.


