अहिल्यानगर-सोशल मीडियावर खासदार निलेश लंके यांच्या विरोधात व्हिडिओ पोस्ट केल्याच्या रागातून एका तरुणाचे पुण्यातील खराडी भागातून अपहरण करून त्याला अहिल्यानगर जिल्ह्यात अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी किशोर महादेव परभणे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीने खासदार निलेश लंके यांच्याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता. याचाच राग मनात धरून आरोपी प्रणय विजय मोरे, शरद खंडू पवार, मारुती देवराम कोकाटे (दोघे रा. चिचोंडी पाटील), रॉबीन सिंग आणि एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीचे पांढऱ्या रंगाच्या स्वीफ्ट कारमधून अपहरण केले.
आरोपींनी किशोर यांना चिचोंडी पाटील येथील हरिओम हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या एका खोलीत डांबून ठेवले. तिथे त्यांचे कपडे काढून, हात-पाय बांधून लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण करण्यात आली. आरोपींनी पीडित तरुणाला जबरदस्तीने संडास साफ करायला लावून अमानुषपणे लघवी पाजल्याचा खळबळजनक आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच या अमानवीय कृत्याचा व्हिडिओ बनवून त्यांना धमकावण्यात आले. या घटनेनंतर आरोपींनी फिर्यादीला बीड जिल्ह्यातील अंभोरा पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्या मर्जीविरोधात काही कागदपत्रांवर लिहून घेतले. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून नगर तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


