सीना नदी संवर्धनासाठी युद्धपातळीवर कामे राबविणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
अतिक्रमित वीटभट्ट्यांवरही कारवाई होणार
अहिल्यानगर, दि. ८ – सीना नदी हा अहिल्यानगर शहराचा मानबिंदू असून नदी संवर्धन, अतिक्रमण निर्मूलन आणि नदीपात्र रुंदीकरणासाठी व्यापक स्तरावर कामे हाती घेण्यात येणार आहेत. अतिक्रमण करणाऱ्या वीटभट्ट्यांसह कोणीही असले तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच, नदीचे नैसर्गिक स्वरूप जपून नागरिकांसाठी चांगल्या सार्वजनिक जागा विकसित केल्या जातील, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शहरातील सीना नदीच्या हद्द निश्चितीच्या कामाची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षांत नदीच्या भोवताली मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याने नदीचे पात्र शिल्लक राहिलेले नाही. आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला असून, पहिल्या टप्प्यात ३ किलोमीटरपर्यंतचे रुंदीकरण व अतिक्रमण काढण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. आता नव्याने महापालिकेला आपत्ती व्यवस्थापनातून आणि जलसंपदा खात्याकडून निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण केले जाईल. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून संपूर्ण १४-१५ किलोमीटर नदीपात्रातील अतिक्रमणे हटवून रुंदीकरणाचे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर केले जाणार आहे.
शहरातील अनेक नाल्यांचे प्रवाह अतिक्रमणामुळे थांबले असून याचा थेट परिणाम शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा झाली आहे. हे नाले प्रवाही व अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेला सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर पुन्हा नव्याने सर्वेक्षण केले जाईल.
महानगरपालिकेचे सांडपाणी १०० टक्के प्रक्रिया करूनच नदीमध्ये सोडले गेले पाहिजे. अन्यथा नदी स्वच्छ करूनही उपयोग होणार नाही. यासाठी सध्याच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता कमी असल्यास, महापालिकेला आवश्यक त्या सुविधा आणि वाढीव प्रकल्पासाठी स्वतः तरतूद करू, अशी ग्वाहीदेखील पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सीना नदी हद्द निश्चिती, अतिक्रमण हटविणे, रुंदीकरण तसेच संवर्धनासाठी प्रस्तावित कामांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.


