राज्यात सध्या मॉन्सूनच्या पावसाचा जोर कमी झालाय. मात्र, विजांसह पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे आज मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. राज्यातील इतर भागांत ढगाळ हवामान राहून हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.सध्या ईशान्य मध्य प्रदेश परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या क्षेत्राला लागून समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबमधील अमृतसर, मुझफ्फराबाद, कानपूर, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, दाल्तोंगंज, दिघामधून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात सोलापूर याठिकाणी सर्वाधिक ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. तर महाबळेश्वरमध्ये राज्यातील सर्वांत कमी १७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. तसंच सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणात सर्वाधिक ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
राज्याच्या अनेक भागांत पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. आज सोलापूरसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. तर राज्याच्या इतर भागांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


