पाथर्डी तालुक्यात बचत गटातील महिलांची लाखोंची फसवणूक ;अशी झाली फसवणूक

पाथर्डी: तालुक्यातील साकेगाव, मांडवे, चेकेवाडी, खरवंडी तसेच शिरूर कासार परिसरातील बचत गटातील महिलांची एका खासगी फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित अधिकाऱ्याने महिलांच्या बोटांचे ठसे घेऊन त्यांच्या नावाने परस्पर कर्ज उचलणे, खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यावर वर्ग करणे तसेच महिलांनी भरलेले हप्ते कंपनीकडे न जमा करणे असे गंभीर प्रकार केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार साकेगाव येथील बचत गटाच्या मासिक बैठकीत शनिवारी उघड झाला. यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून अनेक महिलांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पुढे मांडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वसुली अधिकारी हा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील असून त्याने स्थानिक युवकाच्या मदतीने हा गैरप्रकार राबविला. महिलांच्या नावाने कर्ज काढून ती रक्कम त्यांच्या खात्यात न देता इतर खात्यांवर वळवण्यात आली. काही प्रकरणांत आधार कार्डला वेगळा मोबाईल क्रमांक जोडून त्याद्वारे पैसे काढल्याचाही प्रकार समोर आला आहे. सध्या पंधरा ते वीस महिलांची फसवणूक उघड झाली असली तरी हा आकडा शंभरपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, फायनान्स कंपनीच्या पाथर्डी येथील कार्यालयाकडून या प्रकरणाची पडताळणी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध अंतर्गत चौकशी सुरू असून किती महिलांची आणि किती रकमेची फसवणूक झाली आहे, याचा तपास केला जात आहे. काही महिलांना पैसे परत केल्याचेही सांगितले जात आहे. पैसे परत न केल्यास पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा कंपनीने दिला आहे.

अशी झाली फसवणूक

एका अशिक्षित महिलेच्या नावावर शेळीपालन योजनेच्या नावाखाली एक लाख रुपयांचे कर्ज काढण्यात आले. दोनदा तिच्या नकळत बोटांचे ठसे घेऊन संपूर्ण रक्कम दुसऱ्याच खात्यात वळवण्यात आली.

धुणी-भांडी करणाऱ्या एका युवतीच्या नावावर कर्ज काढून तिच्या हाती एकही रुपया न देता तिला हप्ते भरण्याची वेळ आली आहे. या प्रकरणामुळे तिच्या कौटुंबिक आयुष्यावरही परिणाम झाला असून ती सध्या मजुरी करून कर्ज फेडत आहे.

काही महिलांकडून कर्जाचे हप्ते वसूल करून त्यांना जुन्याच पावत्या देण्यात आल्या; मात्र संबंधित रक्कम कंपनीकडे जमा करण्यात आली नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles