अहिल्यानगर- एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत झालेल्या बॉयलर स्फोटात जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोतीलाल दौलत वाघ (वय 69, रा. चेतना कॉलनी, श्रीरंगनगर, नवनागापूर, अहिल्यानगर) असे मृत कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतीलाल वाघ हे 20 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.21 वाजता एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत काम करीत होते. त्यावेळी कंपनीतील बॉयलरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. त्यानंतर जखमांमध्ये संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान 22 ऑगस्ट रोजी पहाटे 1.37 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकार्यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आवश्यक ती कार्यवाही सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दीपक जाधव करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण, बॉयलर स्फोटाची परिस्थिती आणि त्यासंदर्भातील इतर बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.


