धाराशिवच्या नळदुर्ग येथील उपळी बुर्जावरून अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह उडी मारून आत्महत्या केलेल्या दुर्दैवी घटनेत आता आईसह तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. धाराशिव येथील शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मृत्यूची झुंज देणाऱ्या वीरा पौळ हिचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर धाराशिव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने वीरा हिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या घटनेत अश्विनी पौळ अजिंक्य पौळ यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी असलेल्या क्रांती पौळचा त्याच रात्री उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. या तिघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आता चौथा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, अश्विनी पौळ आणि तीन मुलांच्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेले पती मनोहर पौळ व सासरा अंकुश पौळ यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 9 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून 100 फूट खोल दरीत उडी घेतली होती. घटनेत अश्विनी पौळ आणि साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य पौळ यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या अडीच वर्षांची मुलगी क्रांती पौळ हिचा त्याच दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या तिघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर आता मृत्यूशी झुंज देत असलेली क्रांतीची जुळी बहीण वीरा पौळ हिचादेखील उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


