भाचीला फोन केल्याच्या संशयातून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहिल्यानगर, : भाचीला फोन केल्याच्या संशयावरून एका तरुणाला लाकडी दांडके, लोखंडी गज तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना पोखर्डी अहिल्यानगर परिसरात बुधवारी 24 जून रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण गुंड वय 37, रा. शेंडी, ता. अहिल्यानगर हे बुधवारी सायंकाळी 7.20 वाजण्याच्या सुमारास ससेवस्ती येथील मैदानावर क्रिकेट खेळत असताना संशयित आरोपींनी मोबाईलवर संपर्क साधून त्यांना पोखर्डी येथील घरी बोलावून घेतले.
तेथे ‘तू माझी भाचीला फोन का करतोस?’ असा जाब विचारण्यात आला. त्यावर फिर्यादीने, ‘तुम्ही समजता तसे काही नाही. ती मला फोन करते म्हणून मी तिलाही फोन करतो’, असे सांगितल्याने संशयित आरोपी संतप्त झाले.
लाकडी दांडक्याने मारहाण
यानंतर संशयित आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच लोखंडी गज, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
जखमी प्रवीण गुंड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस अंमलदार खेडकर करीत आहेत.


