लोकन्यायालयात मोटार अपघात प्रकरणात ४४ लाखांची नुकसानभरपाई
तडजोडीने प्रकरण निकाली मयत मानसी शर्मा यांच्या वारसांना धनादेश प्रदान
अहिल्यानगर : प्रतिनिधी दि. १२ सप्टेंबर २०२६: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर व जिल्हा न्यायालय, अहमदनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात मोटार अपघात नुकसानभरपाईच्या एका प्रकरणात मयत मानसी हेमंत शर्मा यांच्या वारसांना तब्बल ४४ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. अर्जदारांच्या वतीने ॲड. श्री. राहुल झावरे व ॲड. श्रीमती स्नेहा राहुल झावरे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. विमा कंपनी व अर्जदार यांच्यात आपसात तडजोड होऊन ४४ लाख रुपयांची नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली. त्याबाबतचे तडजोडपत्र राष्ट्रीय लोकन्यायालयात नोंदविण्यात आले.
लोकन्यायालयाच्या आदेशानुसार आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडून मयत मानसी शर्मा यांच्या वारस मायादेवी शर्मा यांना नुकसानभरपाईच्या रकमेचा धनादेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब श्री. शिवाजी कचरे, अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायाधीश-१व अतिरिक्त सत्र न्यायाधीश साहेब श्री. आर. एस. गुप्ता, यांच्या हस्ते संबधित वारसांना प्रदान करण्यात आला. यावेळी श्री. के. एस. कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश-६, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, वाय. एस. पैठणकर, पॅनल विधीज्ञ ॲड. श्री. फारुक शेख, अर्जदारांचे वकील ॲड. श्री.राहुल झावरे व ॲड. श्रीमती स्नेहा राहुल झावरे, विमा कंपनीच्या वतीने ॲड. श्रीमती सुजाता गुंदेचा, ॲड. श्री. शहादेव जगताप, सुधा भगत तसेच आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा न्यायाधीश-१व अतिरिक्त सत्र न्यायाधीश साहेब श्री. आर. एस. गुप्ता, यांनी सांगितले की, आपसातील तडजोडीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढल्यास अर्जदार तसेच विमा कंपनी या दोन्ही पक्षांना त्याचा लाभ होतो. वाद तडजोडीने मिटल्यामुळे न्यायव्यवस्थेवरील प्रलंबित प्रकरणांचा ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे न्यायालयाला इतर प्रकरणांमध्ये अधिक प्रभावीपणे न्याय देता येतो. तसेच मोटार अपघात प्रकरणातील अर्जदारांना नुकसानभरपाईची रक्कम लवकर मिळाल्याने त्यांच्या पुढील आयुष्यात आर्थिक स्थैर्य निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे सर्व पक्षकार व विमा कंपन्यांनी परस्पर सामंजस्यातून वाद निकाली काढण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


