राहुरी तालुक्यात शेतजमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा

राहुरी: राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे शेतजमिनीच्या वादाच्या रागातून एका २५ वर्षीय तरुणाला लग्नसमारंभात गाठून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी दोघांसह ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भरत हरिभाऊ वेताळ (आरडगाव, ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास ते तांदुळवाडी येथील राहणे मंगल कार्यालयात लग्नसमारंभासाठी गेले होते. त्यावेळी विजय झुगे याने त्यांना फोन करून लग्नानंतर भेटण्यास सांगितले.

दरम्यान, भरत वेताळ हे लग्नातील गर्दीत उभे असताना ७ ते ८ जण तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करत, आमच्या विरोधात पोलिस ठाण्यात वारंवार तक्रारी करतोस का?, असे म्हणत १५ दिवसांपूर्वी झालेल्या शेतजमिनीच्या वादाच्या रागातून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या गोंधळात फिर्यादी यांच्या खिशातील मोबाईल फोन व रोख रक्कम हरवल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. संबंधित ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून मोबाईल व रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी भरत वेताळ यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी विजय झुगे, इंद्रभान झुगे व इतर ५ ते ६ अनोळखी साथीदार, सर्व रा. आरडगाव, ता. राहुरी, अशा ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles