पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ
अहिल्यानगर, :- राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत थेट कर्जमुक्ती, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ व दोन लाखांवरील कर्जासाठी एकवेळ समझोत्याची सुविधा देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना असून राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना तिचा लाभ मिळणार आहे.
पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांचाही या योजनेत समावेश करण्यात आला असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन व पारदर्शक ठेवण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.
हवामान बदल, अनियमित पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट व उत्पादन खर्चातील वाढ यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असल्याने ही योजना शेतकऱ्यांना नव्याने उभे करण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून तयार करण्यात आली आहे. कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांना सुधारित बियाणे, सूक्ष्म सिंचन, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण व मूल्यवर्धित शेतीसाठी आर्थिक संधी उपलब्ध होतील.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनाही या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार आहे. ऊस, कांदा, डाळिंब, द्राक्षे, कापूस, ज्वारी, हरभरा, सोयाबीन, गहू व विविध फळपिकांवर जिल्ह्याची कृषी अर्थव्यवस्था अवलंबून असून कर्जमुक्तीमुळे पात्र शेतकऱ्यांची पत पुन्हा निर्माण होऊन नव्याने कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी विहिरी, तलाव, बंधारे व जलसंधारणाची कामे करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले होते. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात त्यांच्याच नावाने जाहीर झालेली ही योजना त्यांच्या लोककल्याणकारी कार्याला खरी आदरांजली मानली जात आहे. शेतकरी सक्षम, समृद्ध व आत्मनिर्भर झाला तरच ग्रामीण महाराष्ट्र अधिक बळकट होईल, हाच या योजनेचा व्यापक उद्देश आहे.


