देशाचे पंतप्रधान ज्यांच्यावर विश्वास ठेवतात, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्टमंडळाचे नेतृत्व ज्यांच्याकडे सोपवले जाते, अशा श्रीकांत शिंदे यांना कार्ट म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःच्या नेतृत्वाचे मूल्यमापन करावे, असा घणाघाती पलटवार संजीव भोर यांनी केला आहे. शिवसेना चे राज्य प्रवक्ते संजीव भोर यांनी उद्धव ठाकरे आणि विशेषतः आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ठाकरे गटाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा हल्लाबोल केला.
अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात मोठे विधान केले. निलेश लंके हे मूळचे शिवसैनिक असून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचे निश्चित स्वागत करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
“आजच्या राजकारणात कोणताही नेता आयुष्यभर एकाच पक्षात राहील असे चित्र उरले नाही. राजकारणात संपर्क आणि संवाद कायम सुरू असतो. सर्वच पक्षांचे नेते एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे कोणत्या पक्षात जाईल याबाबत आधीच निश्चितपणे सांगता येत नाही. हीच सध्याची राजकीय वास्तवता आहे”, असे भोर म्हणाले.खासदार निलेश लंके यांच्याबत बोलताना संजीव भोर म्हणाले की, लंके हे पूर्वीपासून शिवसेनेशी जोडले असून त्यांचे अनेक शिवसेना नेत्यांशी जुने संबंध आहेत. पक्ष वेगळे असले तरी वैयक्तिक संपर्क कधीच तुटत नसतात.
शिवसेना शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, “शिवसेनेत येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक इच्छुकाचे आम्ही शंभर टक्के स्वागत करू. मग ते शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीतून असोत, काँग्रेसमधून असोत किंवा इतर कोणत्याही पक्षातून असोत. आमची दारे सर्वांसाठी खुली आहेत, कारण ते सर्व आमचीच माणसे आहेत”.संजीव भोर यांच्या या वक्तव्यामुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, आगामी काळात खासदार निलेश लंके यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुमचे स्वतःचे कार्टच नालायक निघाले. ज्यांना केवळ नाईट लाईफ आणि राजकीय वारसा एवढेच माहीत अशी शिवसेनेचे प्रवक्ते भोर यांची आदित्य ठाकरेंवर टीका
भोर म्हणाले, देशाचे पंतप्रधान ज्या कर्तृत्ववान युवा नेतृत्वावर विश्वास दाखवतात आणि ज्यांना आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देतात, त्या श्रीकांत शिंदेंना तुम्ही कार्ट म्हणता हा नेमका कोणता जळफळाट आहे? यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर थेट निशाणा साधत, तुमचे स्वतःचे कार्टच नालायक निघाले. ज्यांना केवळ नाईट लाईफ आणि राजकीय वारसा एवढेच माहीत आहे, त्यांनी जनतेमध्ये संघर्ष करून नेतृत्व उभे करणाऱ्यांवर टीका करू नये असा टोला लगावला. बायकी आवाजातील तो युवराज आणि दुसरीकडे स्वतःच्या कर्तृत्वावर देशभरात ओळख निर्माण करणारे श्रीकांत शिंदे यांची तुलना होऊच शकत नाही. कर्तृत्व सिद्ध करणाऱ्याला कार्ट म्हणणे ही राजकीय हतबलतेची आणि निराशेची भाषा आहे अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर तुमची साथ सोडतात यामागे कुणाचाही दबाव नसून नेतृत्वावरील विश्वास उडाल्याची भावना
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना भोर म्हणाले, दररोज गद्दार, गद्दार म्हणत राहिल्याने वास्तव बदलणार नाही. तुमचा पक्ष संपला आहे, तुमचे राजकारण उद्ध्वस्त झाले आहे. तुमच्याकडे माणसे राहण्यास तयार नाहीत. अनेक वर्षे तुम्ही राजमहालात राहून राजकारण केले मात्र आता जनतेसमोर यावे लागत असल्याने ही अस्वस्थता दिसून येत आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी ठाकरे गटावर टीका करताना, आज कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर तुमची साथ सोडत आहेत. यामागे कुणाचाही दबाव नसून नेतृत्वावरील विश्वास उडाल्याची भावना आहे. त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. जर संजय राऊत यांना खरोखर स्वाभिमान असता, तर आमच्याकडून निवडून आलेल्या आमदारांच्या मतांवर ते खासदार झाले असल्यामुळे त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा होता असे भोर यांनी स्पष्ट केले.


