राज्यात १७ जागांवरील विधान परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाचा मविआतील काँग्रेसमधील ६० ते ७० नगरसेवक बेपत्ता झाल्याची बातमी समोर येतेय.वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणुकीची पार्श्वभूमीवर मोठी घडामोड होतेय. उमेदवार निश्चित नसतानाही नगरसेवकांची पळवापळवी सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसचे जवळपास ७० नगरसेवक संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय.
काँग्रेसचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे. परंतु नगरसेवक गायब झाल्याने काँग्रेस नेत्यांची चिंता वाढली आहे. पक्षांतर्गत अस्वस्थता समोर आली आहे. विधान परिषदेची निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधीच्या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, नगरसेवक मतदान करतील, त्यामुळे प्रत्येक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्याला महत्त्व आले आहे. अशातच भाजपने मोठी खेळी खेळली आहे.
दरम्यान नगरसेवक गायब झाल्यानं विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडे बाजार होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. एका मतासाठी १० लाखांपर्यंत व्यवहार झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. नगरसेवकांना आगाऊ रक्कम दिल्याचा दावा करण्यात येत आहे.एकीकडे भाजपवर घोडेबाजाराचा आरोप होत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. भाजप-महायुती सर्व 17 जागा जिंकणार,नागपूरात सर्वच पक्षांना आवाहन केलं आहे की 800 पैकी 600 मतं भाजप महायुतीकडे आहे,त्यामुळे एक साईड निवडणूक आहे,संख्याबळावर या निवडणूक होत असतात,पण संख्याबळ नसेल तर निवडणुका या बिनविरोध व्हाव्यात असं माझं मत आहे,मी सर्वांशी बोलणार आहे,हर्षवर्धन सपकाळ,शरद पवार,उद्धव ठाकरे यांना विनंती करणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.


