Saturday, February 21, 2026

अहिल्यानगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून आक्षेपांचा भडीमार; स्वबळावर लढा, आमदार मदत करत नाहीत

अहिल्यानगर : आमदार भाजप पक्ष संघटना वाढीसाठी मदत करत नाहीत, आगामी निवडणुका स्वबळावर लढा, शासकीय समित्यांवर नियुक्त करताना नवा- जुना वाद करू नका, असे अनेक हरकतीचे मुद्दे भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे उपस्थित केले.भाजप पदाधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत मंत्री विखे यांनी पक्ष संघटनेबाबत पदाधिकाऱ्यांनी सूचना कराव्यात, असे आवाहन करताच कार्यकर्त्यांनी आक्षेपांचा भडीमार केला.

अनिल गट्टानी यांनी महापालिकेत कोणाबरोबरही युती-आघाडी नको, भाजपने स्वबळावर निवडणुका लढवावी, अशी मागणी केली. अरुण जगताप यांनी श्रीगोंद्यात नव्या-जुन्या वादाचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला व कमी मतदान झाल्याचे सांगत आमदारांच्या चुकीबद्दल कार्यकर्त्यांना जबाबदार धरू नका, असाही उल्लेख केला. पारनेरचे विलास हारदे यांनी निवडून आलेले पक्ष वाढीसाठी मदत करत नाहीत, आमदार केवळ स्वतःकडे पाहतात, पक्षाकडे नाही, अशी खंत व्यक्त केली.

मंडलाध्यक्षांमार्फत शासकीय समित्यांवरील नावे मागवली जातील, मंडलाध्यक्षांनी कोण पक्षात येण्यास इच्छुक आहेत, याची माहिती घ्यावी. कोणी ताकतवर असेल तर त्याचा वेगळा विचार केला जाईल. मात्र, इतर कोणी येत असेल तर त्याला प्रथम पक्षात काम करा, असा सल्ला दिला जाईल, असेही विखे म्हणाले.विविध शासकीय समित्यांचे सदस्य, विशेष कार्यकारी अधिकारी, जिल्हा व तालुका संघटना कार्यकारिणीवरील नियुक्ती ३० जूनपर्यंत पूर्ण होतील, असे सांगताना मंत्री विखे यांनी त्यासाठी मंडलाध्यक्षांकडे जे फॉर्म दिले आहेत. त्यावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या मतदानाच्या टक्केवारीनुसार या नियुक्त्या केल्या जातील, असाही उल्लेख केला. ज्यांना पक्ष संघटनेत स्थान मिळेल, त्यांना समितीत नाही, असाही उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक व्यक्ती-एक पदची अस्वस्थता निर्माण झालेली जाणवली.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या कामाबद्दल पोलीस अधिकारी, प्रशासनातील अधिकारी यांना सूचना देण्याची मागणी मंत्री विखे यांच्याकडे करण्यात आली. संगमनेरमधील महिला पदाधिकाऱ्याने जेथे पक्षाचे आमदार नाहीत, तेथे मंत्री विखे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली. त्यावर बोलताना विखे म्हणाले जेथे पक्षाचे आमदार आहेत तेथे आमदारांमार्फत कामे होतील. माझ्याकडे थेट येण्याऐवजी आमदारांमार्फत यावे. जेथे पक्षाचे आमदार नाहीत तेथे मी थेट लक्ष घालेल. संगमनेरमधील आमदार अमोल दाते आपलेच आहेत. आपणच त्यांना शिवसेनेत पाठवले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles