इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचे गूढ आता हळूहळू उलगडत आहे. राजा रघुवंशीची हत्या त्याची पत्नी सोनमनेच केल्याचं स्पष्ट झालं. या हत्येनंतर सोनम मेघालयातून गाजीपूरला पळून गेली आणि दबावाखाली आत्मसमर्पण केले. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनमसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
हनीमूनला गेलेला राजा बेपत्ता झाला आणि त्यानंतर पाच दिवसात त्याचा मृतदेहच हाती आला. पाच वर्षांनी लहान असलेल्या राज कुशावह नावाच्या बॉयफ्रेंडसाठी सोनमने तिच्या पतीच्या काटा काढला, तोही लग्न झाल्यानंतर अवघ्या 13 दिवसात. या प्रकरणाची टाईमलाईन कशी आहे ते पाहुयात,
तारीख- 10 मे 2025
राजा रघुवंशींचा सोनमसोबत विवाह झाला. त्यावेळी काढण्यात आलेल्या फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या नव्या आयुष्याची सुरुवात त्यांनी केली खरी, पण हाच नवा प्रवास राजा रघुवंशीसाठी आयुष्याचा शेवट करणारा प्रवास ठरला.
तारीख- 20 मे 2025
दोघेही हनिमूनसाठी शिलाँगला रवाना झाले. शिलाँगला जायचे प्लॅनिंग सोनमने केलं होतं.
तारीख- 23 मे 2025
राजा आणि सोनमने मेघालयातील अनेक ठिकाणं पाहिली. सुरुवातीला दोघेही कुटुंबाच्या संपर्कात होते. या कपलने नोंग्रियाटच्या शिपारा होमस्टेमध्ये रात्री मुक्काम केला. या हॉटेलमधून चेकआऊट केल्यानंतर दोघेही बेपत्ता झाले.
खरं तर राजाच्या हत्येचा कट त्याची पत्नी सोनमने आधीच शिजवला होता. हनीमूनला जाण्याची तिकीटं सोनमने बुक केली होती. राजा रघुवंशीचे भाऊ त्याल म्हणाले होते, आता नको नंतर जाऊ. तरीही सोनमने तिकीट बुक केल्यामुळे दोघं हनीमूनला गेले. ठरल्याप्रमाणे सोनमने सुपारी देऊन राजाची हत्या केली आणि सोनम बेपत्ता झाली
तारीख- 2 जून 2025
मेघालयच्या एका धबधब्याजवळ राजाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. त्याच्या हातावरचा टॅटू आणि हातातल्या स्मार्टवॉचमुळे त्याची ओळख पटली.
तर सोनम रघुवंशीच्या लग्नात राज कुशवाहा देखील उपस्थित होता, अशी माहिती समोर आली आहे. लग्नाच्या वेळी जेव्हा सोनम स्टेजवर आली, तेव्हा राज अचानक रडू लागला. हे पाहून कुटुंबातील सदस्य काहीसे आश्चर्यचकित झाले होते. राज इतका भावूक का झाला? असा प्रश्न त्यांना पडला. मात्र, राज सोनमच्या वडिलांच्या कंपनीत काम करत असल्याने, दोघांमध्ये कामाच्या निमित्ताने जवळीक निर्माण झाली असावी, अशी समजूत कुटुंबीयांनी करून घेतली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनमचं लग्न ठरल्यावरही ती राजला भेटत राहिली. असंही सांगितलं जात आहे की, सोनमने राजला आश्वासन दिलं होतं की, “मी जरी राजाशी लग्न करत असले, तरी तुझी प्रेयसी म्हणून कायम तुझ्यासोबत राहीन.”


