सिताराम सारडा विद्यालयातील मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना हिंद सेवा मंडळाने १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करावे : किरण काळे
कुटुंबियांची सांत्वनपर घेतली भेट, जिल्हा पोलीस अधीक्षकांसह प्रशासनाला निवेदन देत उपयोजनांची केली मागणी
हिंद सेवा मंडळावर ठाकरे शिवसेनेचे गंभीर आरोप
प्रतिनिधी : २५ जून रोजी हिंद सेवा मंडळाच्या सिताराम सारडा विद्यालयामध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकत असणाऱ्या मुस्तकीन तनवीर शेख याची शाळेत दुर्दैवी हत्या झाली. मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी पदाधिकाऱ्यां समवेत सांत्वन पर भेट घेतली. या भेटी नंतर हिंदू सेवा मंडळाकडे लेखी पत्राद्वारे मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त यांना लेखी निवेदन देत विविध मागण्या काळे यांनी केल्या आहेत.
मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची काळे यांनी भेट घेत संवाद साधला. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी सुनील भोसले, विलास उबाळे, सचिन भालेराव, विनोद शिरसाट, यासीर शेख, दानिश शेख, समीर शेख, सिकंदर शेख, तन्वीर शेख, सोनू शेख, अलीम शेख, तुकाराम गायकवाड आदी उपस्थित होते. यानंतर बोलताना काळे म्हणाले, घडलेली घटनाही अत्यंत धक्कादायक असून यामुळे संपूर्ण शहर हे भयग्रस्त झाले आहे. या घटनेमुळे, विशेषत:, सदर विद्यालयात शिकणाऱ्या अन्य विद्यार्थी – विद्यार्थिनी तसेच त्यांच्या पालकांच्या मनावर याचा गंभीर परिणाम झाला आहे. याचे लोन शहरातील अन्य शाळांपर्यंत देखील पोहोचले असून एकूणच सर्वच पालक हे आपण मुलांना शाळेत पाठवतो खरं, परंतू मुलं शाळेत सुरक्षित आहेत काय ? या विचारामुळे चिंतेत आहेत. शालेय विद्यार्थ्यांचे बाल गुन्हेगारीकरण होणे ही समाजासाठी अत्यंत घातक बाब असल्याची चिंता यावेळी त्यांनी व्यक्त केली.
हिंद सेवा मंडळावर शिवसेनेचे गंभीर आरोप :
किरण काळे यांनी हिंद सेवा मंडळावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. काळे म्हणाले, एवढी मोठी घटना घडल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष, सचिव किंवा एकही ट्रस्टी मयत कुटुंबियांच्या घरी साधा भेटी साठी सुद्धा फिरकलेला नाही. विचारपूस केलेली नाही. शाळेतील शेकडो विद्यार्थी, पालक, शिक्षक इतर कर्मचारी घडल्या प्रकारामुळे प्रचंड तणावा खाली असताना संस्थेच्या मानद सचिवांनी घटनेनंतर स्वतःचा वाढदिवस श्रीरामपूर येथे गाजत वाजत साजरा केला. यासाठी संस्थेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना श्रीरामपूरला बोलावून घेण्यात आले. या प्रकरणाची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी चौकशी करत संस्था चालकांवर कारवाई करावी, अशी जाहीर मागणी काळेंनी केली आहे.
संस्थाचालक मलिदा लाटण्यात व्यग्र :
सुमारे शंभर वर्षांहून अधिक मोठी ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या संस्थेत विद्यार्थ्यांची सुरक्षा, संस्थेची शैक्षणिक प्रगती यावर लक्ष नसून संस्थेच्या मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या भूखंडांच्या विक्रीतून आर्थिक मलिदा लाटण्यात संस्थाचालक व्यग्र आहेत. शहराच्या आमदारांना एवढी मोठी घटना घडून देखील याबाबत कोणते ही पाऊल उचलावेसे वाटले नाही ही अत्यंत असंवेदनशील बाब आहे. संस्थाचालक, राजकीय पुढारी यांच्या संगनमतातून हिंद सेवा मंडळ संस्थाचालक संस्थेच्या अधोगतीस जबाबदार असून यामुळे विद्यार्थी, शिक्षक यांचे नुकसान होत असल्याचा आरोप किरण काळेंनी केला आहे.
पोलीस अधीक्षकांकडे ठाकरे सेनेची मागणी :
१) मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा.
२) कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, जेव्हा ते फिर्याद देण्यासाठी गेले त्यावेळी त्यांची फिर्याद ही योग्यरित्या घेतली गेली नाही. ती घेऊन या घटनेच्या मुळाशी जात सखोल सत्यशोधक तपास करत दोषींवर कठोर कारवाई करावी.
३) आपल्या शाळकरी अल्पवयीन मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यात असणाऱ्या त्याच्या पालकांना त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी तात्काळ फिर्याद नोंदवण्या बाबत सक्ती करत असंवेदनशील वर्तन केल्याचा पालकांचा आरोप आहे. याबाबत संबंधित पोलिसांची चौकशी करण्यात यावी.
शिवसेनेने प्रशासनाला सुचविल्या उपायोजना :
काळे यांनी शिवसेनेच्या वतीने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन देत पुढील उपायोजना सुचवल्या आहेत.
१) शहरामध्ये असणाऱ्या शाळांची संख्या मोठी आहे. हजारो विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेतात. सर्व शाळांना शाळांच्या संपूर्ण आवारात, वर्गां मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसविणे अनिवार्य करण्यात यावे.
२) शाळांमध्ये आठवड्यातून किमान एकदा गस्त घालण्याकरिता विशेष पोलीस पथक नेमण्यात यावे.
३) विद्यार्थ्यांना शाळेमध्ये काही त्रास असल्यास आणि त्या कामी शाळा प्रशासना बरोबरच पोलिसांची देखील मदत हवी असल्यास त्यांना ती तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचवता यावी याकरिता प्रत्येक शाळेमध्ये तक्रार पेटी उपलब्ध करून द्याव्यात.
४) प्रत्येक शाळेत प्रत्येकी एक महिला व पुरुष शिक्षकाची विद्यार्थी समुपदेशक म्हणून नेमणूक करण्यात यावी. त्यांना याबाबतचे आवश्यक ते प्रशिक्षण तज्ञांकडून देण्यात यावे.
५) नेमण्यात येणाऱ्या / आलेल्या सदर समुपदेशक शिक्षकांची त्यांनी शाळेमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याबाबत कशा पद्धतीने काम करावे याबाबत पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शन एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात यावे.
६) या उपक्रमाची अंमलबजावणी करत असताना विद्यार्थ्यांच्या बाल मनावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, त्यांना मदत होईल अशा पद्धतीने कार्य करावे.
७) बाल मनोतज्ञांना पाचारण करून विद्यार्थ्यांची सध्याची भयग्रस्त मनस्थिती लक्षात घेता त्यांचे योग्य ते समुपदेशन तातडीने करण्यात यावे.
८) विद्यार्थ्यांचे पालक देखील प्रचंड तणावा खाली आहेत. त्यांची पालक मीटिंग घेत त्यांचे देखील समुपदेशन करत त्यांच्या मनामध्ये आपल्या पाल्यांच्या सुरक्षितते विषयीचा विश्वास निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा.


