मोदींचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातून असेल! मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले उत्तराधिकाऱ्यांच्या स्पर्धेत मी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (रविवार) नागपूरच्या रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती. यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या राजकीय वारसादाराबद्दल भाष्य केले आहे. नरेंद्र मोदी यांचा वारसदार कोण असेल? असा प्रश्न राऊतांना माध्यमांकडून विचारण्यात आला होता. यावर संजय राऊतांनी तो नेता बहुतेक महाराष्ट्रातील असेल असे म्हटले आहे. इतकेच नाही तर हा नेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असेही राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत काय म्हणाले?
“या क्षणी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतंय. म्हणूनच मोदींना बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. संघाची चर्चा ही बंद दाराआड असते. ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाहीत. तरीही काही संकेत असतात, ते संकेत स्पष्ट आहेत. पुढील नेता संघ ठरवेल आणि बहुतेक तो महाराष्ट्रातील असेल,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ७५ वर्षांचे आहेत. तर २०२९ पर्यंत ते ७८ वर्षांचे होणार आहेत. वयाची ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर राजकारणातून दूर व्हावे आणि नव्या पिढीला संधी द्यावी असे फर्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच काही वर्षांपूर्वी काढले होते. त्यामुळे आता हा नियम त्यांनाही लागू होऊन २०२९ साठी भाजप पंतप्रधान पदाचा नवा चेहरा शोधणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील असे सूचक वक्तव्य केले. यावर आता खुद्द फडणवीस यांनी उत्तर देत, पंतप्रधान मोदी हे स्वतः सक्षम असून त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही. २०२९ मध्ये देश पुन्हा त्यांनाच पंतप्रधान म्हणून पाहण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य केले. नागपूर मध्ये एका कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

उत्तराधिकारी शोधणे ही मुघली संस्कृती
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सर्वांना विश्वासात घेऊन राज्याच्या कारभार सुरू आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी जे लोक आम्हाला मदत करतील त्या सर्वांना सोबत घेऊनच आम्ही काम करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सक्षम आहेत. त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही. ते अजून बरेच वर्ष काम करू शकतात. २०२९ मध्ये पंतप्रधान म्हणून देश मोदींकडे पाहत आहे. वडील जिवंत असताना त्यांचा वारसदार शोधणे ही आमच्या देशाची परंपरा नाही. ही मुघली संस्कृती आहे आणि तसाही उत्तराधिकारी याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles