Thursday, March 5, 2026

अहिल्यानगर ते पुणे दौंड मार्गे इंटरसिटी रेल्वे तातडीने सुरू करावी

पुणे-अहिल्यानगर नव्या रेल्वे प्रकल्पाचे स्वागत; मात्र दौंड मार्गे इंटरसिटी रेल्वे तातडीने सुरू करावी – स्वाती सिरसुल

अहिल्यानगर : अनेक वर्षांपासून प्रवासी, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांकडून अहिल्यानगर ते पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जात असतानाही, अद्यापही ही सेवा सुरू करण्यात आलेली नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्वाती सिरसुल यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, सध्या जाहीर झालेल्या पुणे-अहिल्यानगर या नवीन रेल्वे प्रकल्पाचे स्वागत आहे, परंतु या प्रकल्पाला प्रत्यक्षात पूर्णत्वास अनेक वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तातडीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी अहिल्यानगर ते पुणे व्हाया दौंड इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे.

दररोज हजारो प्रवासी अहिल्यानगर ते पुणे या मार्गावर प्रवास करतात. शिक्रापूर, सणसवाडी, वाघोली, हडपसर बायपास आणि पुणे शहरातील विविध चौकांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे १२० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी चार ते पाच तास लागतात. त्यामुळे प्रवाशांना वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय सहन करावा लागतो. व्यापारी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग या कारणांमुळे प्रचंड त्रास सहन करत असून अनेक वेळा पुणे जाण्याची इच्छा असूनही वाहतूक कोंडीमुळे प्रवास टाळावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन तातडीने दौंड मार्गे रेल्वे सेवा सुरू करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्वाती सिरसुल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, दौंड जंक्शन जवळील कोडलाईन आधीपासूनच अस्तित्वात असताना आणि त्या मार्गावर रेल्वे वाहतुकीसाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध असूनही, आजपर्यंत अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी सेवा सुरू का करण्यात आलेली नाही? याबाबत रेल्वे प्रशासनाने आजवर कोणताही खुलासा का केलेला नाही? या बाबत सामान्य प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी असून या मागणीला आता अधिक वेळ दिरंगाई न करता तातडीने प्रतिसाद देणे गरजेचे आहे.

नवीन रेल्वे प्रकल्प हा केडगाव, सुपा, शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर, वाघोलीमार्गे पुण्याशी जोडणारा असून सुमारे ११६ किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ११,००० कोटी खर्च अपेक्षित असून डीपीआर रेल्वे बोर्डाने मंजूर केला आहे, ही बाब आनंददायी असली तरी प्रत्यक्षात जमीन संपादन, रुळ टाकणे, स्टेशन उभारणी यासारख्या कामांसाठी अनेक वर्षे लागणार आहेत. त्यामुळे नगरवासीयांसाठी तातडीचा आणि वास्तववादी पर्याय म्हणून दौंड मार्गे रेल्वे सेवा सुरू करणे हाच योग्य मार्ग असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी, सामाजिक संघटनांनी आणि नागरिकांनी एकत्र येऊन अहिल्यानगर ते पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा तातडीने सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी स्वाती सिरसुल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles