कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आणि शेतकरी संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यातच विधिमंडळात माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी एक्स माध्यमावर शेअर केल्याने ते चांगलेच अडचणीत सापडले आहे. विरोधक माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माणिकराव कोकाटे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तर “मी राजीनामा देण्यासारखं काहीच केलं नाही. मी सभागृहात रमी खेळत नव्हतो, मोबाईलमध्ये आलेली जाहिरात स्कीप करत होतो, असं स्पष्टीकरण माणिकराव कोकाटे यांनी व्हायरल व्हिडीओवर दिले आहे. आता नाशिकच्या शेतकऱ्याने माझ्यासाठी रमी खेळा, काहीतरी जिंका आणि मला पाठवा, असे म्हणत 5550 रुपयांची मनीऑर्डरच माणिकराव कोकाटेंना यांना पाठवली आहे.
निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील देवगाव येथील तरुण शेतकऱ्याने शेतात पाणी साचल्याने आणलेले बियाणे पेरता आले नाही. त्यामुळे पडून असलेले बियाणे विक्री करून थेट राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनाच वेगळ्या पद्धतीने साकडे घातले आहे. आपले 5550 रुपये मनीऑर्डरने कृषिमंत्री कार्यालय, मुंबई येथे पाठवून, “हे पैसे वापरून माझ्यासाठी एक रमीचा डाव खेळा आणि काहीतरी जिंकून पाठवा,” अशी विनंती केली आहे.
देवगाव येथील योगेश खुळे असे तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. यंदाच्या हंगामात शेतजमिनीत पेरणीसाठी त्यांनी प्रत्येकी 1850 रुपये किमतीच्या तीन पिशव्या असे 5550 रुपयांचे बियाणे विकत घेतले. मात्र, सततच्या पावसाने जमिनीत पाणी साचून जमीन नापीक झाली. त्यामुळे त्यांना बियाणे पेरता आले नाहीत. तर योगेश खुळे यांनी अलीकडेच कृषीमंत्र्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ पाहिला होता.
त्यावर उपरोधिक प्रतिक्रिया देत ‘माझं बियाणे तसेच पडून आहे, उत्पन्न नाही, रमीही खेळता येत नाही. म्हणून मी बियाणे विकून मिळालेले पैसे कृषीमंत्र्यांना पाठवले आहेत. शेतीचा डाव हरल्याने वैफल्यात गेलेल्या या शेतकऱ्याच्या शब्दांमध्ये उपहास आहे. पण, त्यामागे सखोल वेदनाही आहे. या प्रकारामुळे कृषीविषयक धोरणे, बियाण्यांचे नुकसान, हवामानातील अनियमितता आणि बेभरवशाच्या जीवनशैलीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शेतकरी खुळे यांची ही व्यथा एकट्याची नाही, तर जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची आहे. यंदा नापिकी, हवामान बदल, अनियमित पावसाळा, अपुरी सरकारी मदत आणि नशिबाचा खेळ यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.


