पंतप्रधान मोदींचे सदस्यत्व रद्द करा; उच्च न्यायालयात दाद मागण्याचाही दिला इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले. त्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला. नरेंद्र मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याने त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.आचारसंहितेचा भंग केल्याचे निवडणूक आयोगाने मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली, पण मोदींवर कारवाई केली नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कठोर कारवाई करण्यात आली होती. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. मग नरेंद्र मोदींवर आयोग कारवाई का करत नाही? असा सवाल करत चव्हाण यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

२८ डिसेंबर २०२० रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन रेल्वे मंत्री, कृषी मंत्री यांनी सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या किसान रेल्वेच्या १०० व्या गाडीचा शुभारंभ केला. यावेळी महाराष्ट्रात ग्रामपंचायत तर पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु होत्या. हा कार्यक्रम देशभर टीव्हीवर प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासन यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. याविषयी प्रफुल्ल कदम या कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असता सुरुवातीला वेळकाढूपणा करण्यात आला. पण शेवटी आचारसंहिता भंग झाल्याचे मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज देण्यात आली. या प्रकरणी सरळ सरळ कायदा धाब्यावर बसवण्यात आल्याचे स्पष्ट दिसत असतानाही नरेंद्र मोदी यांच्यावर कारवाई केली जात नाही, असे चव्हाण म्हणाले.

दरम्यान, लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम केल्याचे ३० वेळा सांगितले, त्यावर मोदी गप्प आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान ते खोडून का काढत नाहीत. मोदी खोटे बोलत आहेत, का ट्रम्प हे स्पष्ट झाले पाहिजे. तसेच केंद्रातील भाजप सरकारने शिमला करार रद्द केला आहे का आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केलेल्या विधानावर मोदी सरकारने खुलासा केला पाहिजे, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles