Saturday, February 21, 2026

नगर शहरातील चितळे रोडवरील नेहरू मार्केटमध्ये चार मजली संकुल होणार !मनपा आयुक्त यशवंत डांगे

नेहरू मार्केट उभारणीचे काम लवकरच सुरू होणार

चार मजली संकुलात तळ मजल्यावर भाजी विक्रेत्यांसाठी ७० ओटे उपलब्ध होणार

व्यावसायिकांसाठी ६१ गाळे, जुन्या मूळ गाळेधारकांचेच पुनर्वसन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

अहिल्यानगर – अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नेहरू मार्केट संकुलाच्या नव्याने उभारणीसाठी महानगरपालिकेने कार्यारंभ आदेश दिला आहे. जागेची मोजणी करून व जागा अतिक्रमण मुक्त करून महानगरपालिकेने जागेचा ताबा घेत, त्याला पत्र्याचे कंपाऊंड केले आहे. लवकरच नेहरू मार्केटच्या उभारणीचे काम सुरू होणार आहे. तळमजला व त्यावर तीन मजले अशा चार मजली संकुलात तळ मजल्यावर भाजी विक्रेत्यांसाठी ७० ओटे असणार आहेत. तसेच, व्यावसायिकांसाठी ६१ गाळे उपलब्ध होणार आहेत. जुन्या गाळेधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. गाळे व्यावसायिकांसाठी असून, ज्यांना भाजी विक्री करायची आहे त्यांना ओटे उपलब्ध असणार आहेत, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

नेहरू मार्केच्या प्रस्तावित जागेची मोजणी होऊन खुणा करण्यात आल्या होत्या. या जागेला संरक्षक भिंत उभारून प्रत्यक्ष उभारणी सुरू केली जाणार आहे. त्यासाठी ठेकेदाराची नियुक्तीही करण्यात आली आहे. नव्याने होणाऱ्या संकुलात तळघर, तळमजला व तीन मजले अशी इमारत असणार आहे. यात तळघरात व तळ मजल्यावर १२ चारचाकी व ७० दुचाकींसाठी पार्किंग सुविधा आहे. तळ मजल्यावर १० गाळे असतील. तर प्रत्येक मजल्यावर १७ याप्रमाणे तीन मजल्यांवर ५१ गाळे असणार आहेत. तसेच, तळ मजल्यावर भाजी विक्रेत्यांसाठी ७० ओटे असणार आहेत.

महापालिकेने जुने गाळेधारक व ओटेधारक भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. इमारतीत व्यापारी संकुल व भाजी मार्केट असे दोन भाग आहेत. भाजी विक्रेत्यांसाठी ७० ओटे तळमजल्यावर उपलब्ध असणार आहेत. व्यापारी संकुलात ६१ गाळे वाणिज्य वापरासाठी असणार आहेत. ज्यांना व्यवसाय करायचा आहे, त्या जुन्या गाळेधारकांना महानगरपालिका नियोजन करून गाळा देईल. ज्यांना भाजीविक्री करायची आहे त्यांच्यासाठी ओटे उपलब्ध आहेत. त्यामुळे वरच्या मजल्यावर भाजी घ्यायला कोण येणार, हा मुद्दाच असू शकत नाही. महापालिकेकडे ज्यांच्या नावाने यापूर्वी गाळ्याची नोंद आहे, ती व्यक्तीलाच गाळा किंवा जागा दिली जाणार आहे. चुकीच्या मागण्या करून प्रकल्पाचे काम अडवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles