अहिल्यानगर -शहरातील केडगाव परिसरातील वैष्णवनगर येथे राहणारी 36 वर्षीय विवाहित महिला घरातून कोणालाही काहीही न सांगता अचानक निघून गेल्याची घटना समोर आली आहे. संबंधित महिलेचा नातेवाईकांसह परिसरात शोध घेऊनही ती आढळून न आल्याने तिच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवनगर, तिरंगा चौक, केडगाव, 54 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या पती व मुलगा यांच्यासह वास्तव्यास असून मागील दोन वर्षांपासून त्यांची मुलगी व तिचा मुलगा हेही त्यांच्याकडे राहत आहेत. सोमवारी (29 जून) वटपौर्णिमेनिमित्त फिर्यादी व त्यांची मुलगी वैष्णवनगर येथील बालवाडी जवळील वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी गेल्या होत्या.
पूजा करून त्या दुपारी 12.30 वाजता घरी परतल्या. त्यानंतर फिर्यादी घरकामात व्यस्त असताना त्यांची मुलगी घरासमोर बसलेली होती. काही वेळाने तिने आपल्या मुलाला घरीच ठेवले आणि कोणालाही काहीही न सांगता अचानक घरातून निघून गेली. बराच वेळ उलटूनही मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे तिचा वैष्णवनगर परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. मात्र ती कुठेही आढळून न आल्याने अखेर कोतवाली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. पोलीस तिचा शोध घेत आहेत.


