अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने नागरिकांना आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याबाबत माहिती व तक्रार देण्यासाठी आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील सभागृह नेता यांच्या दालनात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी सायली सोळंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, त्यांना सहाय्यक म्हणून नगररचना विभागाचे रचना सहाय्यक जितेंद्र शेळके, अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ, क्षेत्रीय अधिकारी रिझवान शेख यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीची आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेल्या वेळेपासून व दिनांकापासून लागू झाली आहे.
निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता अंमलात राहील. ही आचारसंहिता महानगरपालिकेच्या संपूर्ण क्षेत्रात लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर प्रलोभन देणारी कोणतीही कृती अथवा घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, इतर पदाधिकार्यांना किंवा शासनाच्या विभागाला इतरत्र सुध्दा करता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे डांगे यांनी सांगितले.


