अहिल्यानगर: महापालिका निवडणूक मतदान प्रक्रियेच्या प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहणाऱ्या सुमारे ४५० कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. या व्यतिरिक्त निवडणूक प्रक्रियेच्या कामासाठी नियुक्त केल्याचे आदेश दिल्यानंतरही ती जबाबदारी न स्वीकारणाऱ्या १५०, अशा एकूण सुमारे ६०० कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
दरम्यान चुकीच्या पद्धतीने काढलेल्या या नोटिसांना जिल्हा माध्यमिक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांनी हरकत घेतली आहे. त्यांनी सांगितले की, निवडणूक काळात शिक्षकांचे हाल होतात. केंद्रावर त्यांना वेळेवर जेवण व पाणी मिळत नाही. मतदानाचा टक्का वाढत असताना त्या प्रमाणात कर्मचारी संख्या वाढवणे महत्त्वाचे आहे. मागणी केल्याप्रमाणे कर्मचारी संख्या वाढवली जात नाही. शैक्षणिक जबाबदारी सांभाळून शिक्षक एकाचवेळी अनेक काम करत आहेत. निवडणूक काळात निर्माण झालेला सावळागोंधळ शिक्षकांच्या माथी मारला जात आहे. त्यांना वेठीस धरले जात आहे. चुकीच्या पद्धतीने शिक्षकांना दिलेल्या नोटिसा प्रशासनाने मागे घ्याव्यात. निवडणूक काळात फक्त २० टक्के शिक्षक घ्यावेत व इतर विभागातून कर्मचारी वर्ग उपलब्ध करावा, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
महापालिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या सहीने या नोटीसा धाडण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे यांनी दिली. महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. आज, शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. प्रचाराला रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. मतदान यंत्रांची पडताळणीही करण्यात आली आहे. दि. २९ डिसेंबरला मतदानासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. निवडणुकीसाठी सुमारे २२०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत त्यामध्ये प्राथमिक शिक्षकांसह विविध खात्यांकडील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पहिल्या प्रशिक्षण वर्गासाठी सुमारे १८०० कर्मचारी हजर राहिले. उर्वरित ४५० कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अनुपस्थितीबद्दल विभागीय चौकशी करून कारवाई का करू नये अशा आशयाच्या नोटीस बजावण्यात आले आहेत.
निवडणूक प्रक्रियेचे काम ताण-तणावाचे असते तसेच ते संवेदनशीलपणे करावे लागते. त्यामुळे अनेक कर्मचारी ही काम नको अशी मानसिकता असतात. त्यातूनच सुमारे ३०० वर कर्मचाऱ्यांनी आजारपण, कौटुंबिक, अपंगत्व अशी विविध कारणे देत निवडणुकीसाठी नियुक्ती नकोचे अर्ज महापालिका प्रशासनाकडे दिले होते. त्यांनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अशा नोटीसा बजावण्यात आलेल्या जवळपास निम्म्या कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामकाजासाठी हजर राहत असल्याचे कळवले आहे. ज्यांची खरोखरच अडचण आहे, अशांची पडताळणी करून त्यांना सवलत दिली जात असल्याचे सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे यांनी सांगितले.


