महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
३० जूनपूर्वी सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली अधिकृत घोषणा
राज्य सरकारने शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिलीय. सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी पूर्ण करणार आहे. सरकार ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार आहे. ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल,अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या समितीचा अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर जून महिना संपण्याच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाईल,” असे कृषिमंत्री भरणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी आणि काही शेतकरी नेत्यांनी आक्रमक आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२६ पूर्वी शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते, आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा करत राज्यातील शेतकऱ्यांना आश्वस्त केलंय.


