Saharshaikh महापालिका निवडणुकीतील विजयानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( एआयएमआयएम) पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी “कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है” असे वक्तव्य केले होते. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान, सहर शेखने माफीनामा लिहून दिला असून त्याबाबत पोलिसांनी तक्रारदारांना लेखी कळविले आहे.
मुंब्रा शहरातून एआयएमआयएम पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सहार युनूस शेख या चांगल्याच चर्चेत आल्या. सहर शेख यांच्यासह एआयएमआयएमचे पाच नगरसेवक निवडून आल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हा धक्का मनाला जातो. या विजयानंतर भाषण करताना शेख यांनी “कैसा हराया, अभी हमलोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है” असे वक्तव्य करत आव्हाडांना डिवचले होते.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन चौकशीबाबत विचारणा केली. त्यावेळी शिंदे यांनी सहर शेखच्या चौकशीचा अहवाल सादर केला.
“अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है” या वक्तव्याबद्दल तिने २३ जानेवारी २०२६ रोजी माफीनामा दिला आहे, असे शिंदे यांनी लिखित स्वरूपात दिले.


