अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अजित पवारांच्या अकाली जाण्याने राज्यातील राजकीय चित्र बदलले. मात्र या अपघाताबाबत आजही अनेकांच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याची चौकशी डीसीजीएने सुरू केली आहे. मात्र अपघातावर नेते हळूहळू व्यक्त होऊ लागलेत. मंत्री छगन भुजबळ यांनीही विमान अपघातावर भाष्य करत विमान अचानक पलटी कसे झाले, काहीतरी गडबड आहे अशी शंका उपस्थित केली आहे.
नाशिक इथल्या शोकसभेत छगन भुजबळ म्हणाले की, देशात अनेक विमान अपघात झाले. परंतु महाराष्ट्रात अशाप्रकारचा भयानक अपघात पहिल्यांदा झाला. मी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा हे विमान इथं आले कसं काय? हे कळेना. टेबल टॉप होता आणि खाली ५०-६० फूट खाली पडले होते. त्यानंतर जेव्हा मी पार्थला भेटलो त्याच्याकडे एक सीसीटीव्ही फुटेज होते. त्यात ते विमान एकदा घिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्यावेळी सरळ असणारे विमान अचानक पलटी मारल्यासारखे दिसते. त्यानंतर काही क्षणात होत्याचे नव्हते होते. चौकशी होईल, मी त्यातला तज्ञ नाही परंतु मी अनेकांशी बोलतोय. त्यात कुठेतरी काही गडबड झालीये, इंजिनमध्ये किंवा रडारमध्ये..आणखी काही असू शकते. चौकशी होईल, त्याची माहितीही येईल. पण जी सोन्यासारखी माणसे गेली ती कशी काय परत येतील असं त्यांनी म्हटलं.
मध्यंतरी काही कारणास्तव मी दादांकडे राजीनामा पाठवून दिला. एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यानंतर अजितदादा थेट मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले आणि तिथून मला फोन केला, आपण फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेऊन काम करतोय. तुम्हाला लोकशाहीत तुमचे विचार मांडण्याचे अधिकार आहेत. तुम्ही ते मांडा पण राजीनाम्याची गोष्ट कशाला करता, राजीनाम्याचे अजिबात बोलायचे नाही असं त्यांनी सांगितले.
अजितदादांच्या अंत्यसंस्कारावेळी चोरट्यांचा सुळसुळाट, अहिल्यानगरसह राज्यभरातून आले होते चोरटे


