Friday, February 20, 2026

अजित पवारांनी ८ वाजून ३७ मिनिटांनी केला होता अखेरचा फोन; कॉल रेकॉर्डिंग आलं समोर वाचा…

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर राज्यभरातील सर्वच पक्षांकडून शोक व्यक्त करण्यात आला. अजूनही अजित पवार यांच्या अकाली मृ्त्यूवर हळहळ व्यक्त होत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर एकीकडे सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी चर्चेचा विषय ठरलेला असताना दुसरीकडे त्यांच्या विमानाला झालेला अपघात हा घातपात होता का? असा संशय खुद्द राष्ट्रवादीसोबतच इतरही काही नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्याबाबत सविस्तर तपास चालू असतानाच अजित पवारांनी विमानातून अपघाताच्या ६ मिनीट आधी केलेल्या एका फोन कॉलचं रेकॉर्डिंग समोर आलं आहे.

बारामतीमध्ये अजित पवार यांचे चुलत पुतणे व पक्षाचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांच्याशी अजित पवारांनी फोन कॉलवर शेवटचा संवाद केला होता. श्रीजीत पवार यांनी अजित पवारांना निवडणुकीसंदर्भात पाठवलेल्या एका मेसेजवर अजित पवारांनी थेट विमानातूनच त्यांना फोन करून त्यांच्या शंकेचं निरसन केलं होतं. यासंदर्भात श्रीजीत पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्या फोन कॉलचं रेकॉर्डिंग सगळ्यांसमोर ठेवलं आहे. यामध्ये अजित पवारांनी श्रीजीत पवार यांना नेमकं काय सांगितलं, हे त्यांनी जाहीर केलं आहे.

“आपण माळी समाजालाही जिल्हा परिषदेसाठी एक उमेदवारी देऊ असा विषय होता. बारामतीमध्ये आपण एनटी समाजाच्या व्यक्तीला जिल्हा परिषदेला उमेदवारी दिली आहे. मार्केट यार्डला गावडेंना घेतलं आहे चेअरमन म्हणून. सातव नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे मी अजित पवारांना तसं विचारलं होतं. ते खरंतर माझं अज्ञान होतं की मला वाटलं आम्ही ओबीसींमधल्या माळी समाजाला उमेदवारी देऊ शकलेलो नाही. त्यामुळे मी मेसेज केला होता की दादा आपण माळी समाजाला एक संधी देऊ. त्यावर त्यांनी सगळ्या जातीधर्मांना सोबत घेऊन जातोय असा संदेश दिला होता. ते जगाला कळावं, शेवटच्या श्वासापर्यंत तो माणूस सगळ्या जाती-धर्मांना सोबत घेऊन काम करत होता हे कळावं म्हणून मी हे रेकॉर्डिंग सगळ्यांसमोर आणलं. आपण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ हाच त्यांचा शेवटचा संदेश, शेवटचा आवाज होता”, असं श्रीजीत पवार यांनी सांगितलं.“मी कधी काही अडचण आली तर त्यांना मेसेज करायचो. त्यांचा फोन यायचा. आज विमानात असतानाही त्यांनी फोन केला. मलाच नाही, कुठल्याही व्यक्तीने त्यांना फोन-मेसेज केला तरी त्याला अजितदादा उत्तर द्यायचे”, असंही ते म्हणाले.

अजित पवार – माहिती नसतं, काही नसतं.. उगीच काहीतरी करायचं. आम्हीही सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जातो बाळा.

श्रीजीत पवार – अजितदादा, मला जे वाटलं ते मी तुमच्यासमोर मांडलं..

अजित पवार – मान्य आहे, बरोबर आहे. पण मी माळी समाजाला जिल्हा परिषदेची उमेदवारी आत्ता दिलेली आहे. तिथे ओबीसींचं आरक्षण होतं. इतर पक्षांनी दुसरेच उमेदवार दिले आहेत. आपण असं काम केलंय.

श्रीजीत पवार – दादा तुम्हाला जो योग्य वाटतो तो अंतिम निर्णय घ्या.

दरम्यान, फोनकॉल अर्धवट सुरू झाल्यासारखं वाटत असलं, तरी ते तसं नसल्याचं श्रीजीत पवार म्हणाले. “मी अजित दादांना मेसेज केला होता. तो मेसेज त्यांनी वाचला आणि माझा नंबर त्यांच्या ओळखीचा असल्यामुळे त्यांनी फोन करून हॅलो वगैरे न बोलता थेट मुद्द्याचं बोलायला सुरुवात केली. त्यामुळे फोन रेकॉर्डिंग इतकंच आहे”, असं ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles