अहिल्यानगर-शहर परिसरातील कल्याण रोडवर किरकोळ वादातून एका तरुणासह त्याच्या मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश किरण बोरुडे आणि त्यांचा मित्र इंद्रजित राहिंज हे दुचाकीवरून जात असताना घोडा टांगा पुढे घेण्याच्या कारणावरून आरोपी सनी राजेंद्र जाधव याच्याशी त्यांचा वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून, फिर्यादी द्वारका लॉन्स परिसरात आले असता आरोपी सनी जाधव, प्रथमेश पठारे, समीर सय्यद आणि प्रणव दाणे यांनी त्यांना गाठले. ’तू खूप माजला आहेस का’ असे म्हणत आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.हल्ल्यादरम्यान गणेश बोरुडे जीव वाचवण्यासाठी पळत असताना आरोपी समीर सय्यद याने त्यांच्या पाठीवर चाकूने वार केले. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी इंद्रजित राहिंज मध्यस्थी करण्यासाठी गेला असता, आरोपी प्रणव दाणे याने त्याच्या चेहर्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सावेडीत घरासमोरून चारचाकीची चोरी
अहिल्यानगर – शहरातील सावेडी परिसरातील पाईपलाईन रोडवर असलेल्या गणेश कॉलनीतून अज्ञात चोरट्याने घरासमोर पार्क केलेली टाटा अल्ट्रोज कार लंपास केली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश भागवतराव बडे (वय ३२, रा. १० वी, भगवान कृपा, गणेश कॉलनी, सावेडी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे स्थापत्य अभियंता असून त्यांच्याकडे पांढर्या रंगाची टाटा कंपनीची अल्ट्रोज कार (क्रमांक एम एच १६ सी व्ही २१२०) आहे. रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांनी आपले वाहन नेहमीप्रमाणे घरासमोर लॉक करून पार्क केले होते. सोमवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास फिर्यादी यांचे वडील घराबाहेर आले असता त्यांना पार्क केलेली कार दिसून आली नाही. परिसरात सर्वत्र शोध घेऊनही वाहन मिळून आले नाही. अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ४ लाख २० हजार रुपये किमतीची ही कार चोरून नेल्याची खात्री पटल्यानंतर बडे यांनी पोलिसांत धाव घेतली.


