राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. या घटनेला होऊन १५ दिवस झाले. या अपघातावर अनेकांनी संशय व्यक्त केलाय. रोहित पवार यांनी अजित पवार यांचा तेरावा झाल्यानंतर जाहीर पत्रकार परिषद घेत घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी या पत्रकार परिषदेत अपघाताबाबत संशय व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले. रोहित पवारांच्या या आरोपावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या विमान अपघातावर प्रतिक्रिया दिली. ‘आमच्या सगळ्या बहीण-भावांचं दादासोबत चांगलं नातं होतं. आमच्या बॅचमध्ये एवढ्या लहान वयात दादा ज्या पद्धतीने गेला हे दादाचं जाण्याचं वय नव्हतं. इतक्या वर्षात दादाला कधी थकलेला, आजारी बघितलं नाही. आज दादा आपल्यात नाही हे खरं वाटत नाही.’, असं म्हणत सुप्रिया सुळे भावुक झाल्या.
रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मोठं विधान केले होते. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शब्द दिला की, या सगळ्याची सविस्तर चौकशी करतील. रोहित पवारांची अस्वस्थता सहाजिक आहे. मुलांना असे वाटतं. त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत. रोहितने अतिशय पारदर्शकपणे प्रश्न मांडले. रोहितने जे प्रश्न मांडले असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ते या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती घेऊन पारदर्शकपणे चौकशी करतील. त्यामुळे या चौकशीची वाट पाहूया.’
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री झाल्या. अजितदादा गेल्यानंतर त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आल्या याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘मी आणि सुनेत्रा वहिनी याआधीही डीपीडीसीला एकत्र होतो. सुनेत्रा वहिनींवर ही नवीन जबाबदारी आहे. सुनेत्रा वहिनी पालकमंत्री झाल्याचा आनंद आहे. पण अजितदादा नसल्याचे दु:खही आहे. सध्या माझ्या एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद आहे. अजितदादा नसण्याचे दु:ख कधीच भरून निघणार नाही. आजही आम्हाला खरं वाटत नाही की अजितदादा आपल्यात नाही. आमचं कुटुंबं सध्या अडचणीतून जात आहे.’


