उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत. सोबतच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाची चर्चा देखील शिगेला पोहोचली आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांकडे असलेली जवळपास सर्व खाती सुनेत्रा पवारांना मिळाली होती. केवळ अर्थ खातं सुनेत्रा पवारांना देण्यात आलं नव्हतं. भाजपनं हे खातं आपल्याकडेच ठेवलं. त्यामुळे दादा जाताच महायुतीत राष्ट्रवादी बॅकफुटला गेल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता मोठी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना आणखी एक मोठी जबाबदारी मिळणार आहे.
आगामी तीन ते चार महिन्यांत राज्याचे वित्त आणि नियोजन खाते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्याचे संकेत मिळत आहेत. अलीकडेच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. याच बैठकीत अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडं देण्याचा निर्णय झाला आहे.


