उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा पूर्णपणे तपास होणार नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हातात गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याही हातात राहिलेली नाहीत, ती अमित शाह यांच्या हातात गेली आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार नाही. त्याऐवजी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच भाजपमध्ये विलीन होईल, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. ते शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रफुल पटेल ज्याअर्थी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊ नये, असे म्हणत आहेत, त्याअर्थी ही अमित शाह यांची इच्छा आहे. या सगळ्यात भाजपचा अदृश्य हात आहे. सगळं काही अमित शाह यांच्या इच्छेनुसारच होईल. प्रफुल पटेल बोलत आहेत म्हणजे अमित शाहच बोलत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्रे अमित शाह यांच्यात हातात गेली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही ते नियंत्रण उरलेले नाही. भविष्यात अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपमध्येच विलीन होईल, राष्ट्रवादीचे सगळे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला दहा तोंडे फुटली आहेत. अजित पवार हा एकखांबी तंबू होता. तो कोसळून पडल्यानंतर या तंबूतील उंट, घोडे, बैल यांची धावाधाव सुरु आहे


