इंदापुरमधील भिगवण भागातील घटनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरु आहे. भिगवनमध्ये आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना 21 वर्षीय तरुणीचे भरदिवसा अपहरण झाल्याची घटना मंगळवारी (दि. 17) दुपारी चारच्या सुमारास घडली. तरुणीच्या आईला व भावाला मारहाण करीत डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने टेम्पोमध्ये नेल्याची फिर्याद तरूणीच्या घरातील व्यक्तींनी पोलिसांना दिली होती. मात्र हे सगळं खोटं असल्याचं तरुणीने स्पष्ट केलं आहे. संबंधित तरुणीने जबरदस्तीने नाही तर माझ्या इच्छेने मी निघून गेले असल्याचे स्पष्ट केले. तसेच काल मध्यरात्री 1.30 वाजता बारामती पोलीस स्थानकात देखील संबंधित तरुणी उपस्थित राहिली. त्यानंतर आज दुपारी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी पत्रकार परिषद घेऊन भिगवण अपहरण घटनेची सविस्तर माहिती दिली.
सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुलीच्या आई आणि भावाचं म्हणणही ऐकून घेतलं आहे. त्या मुलीने आपल्या आई आणि भावासमोर देखील आपलं म्हणणं मांडलं आहे. मात्र तिच्या आई आणि भावाचा वेगळा आरोप असल्याने आम्ही आता आणखी चौकशी करत आहोत. संबंधित तरुणीने कोर्टासमोरही तिचं सगळं म्हणणं मांडलं आहे. दोघांचेही स्टेटमेंट्स , घटनाक्रम जो सांगितला तो वेगळा आहे. सगळ्यामध्ये तफावत आहे. त्यामुळे आम्ही सखोल तपास करत आहोत. आई आणि मुलीची भेट झाली आहे. त्यांनी आपापसात संवादही केला. मात्र मुलीने तिच्या आईकडे जाण्यास नकार दिला, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली.
मुलगा आणि मुलगी अपहरण झाल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरवरून मुलगी आणि मुलगा मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर आता विविध खुलासे समोर येत आहे. पोलिसांनी साडेपाच वाजता मुलाला प्रायव्हेट गाडीतून घेऊन गेलेले आहेत. मुलीच्या मित्राला सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञातस्थळी ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
संबंधित तरुणीने एक प्रतिज्ञापत्र तयार केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात माझं आणि त्याचं प्रेम होतं. मी हे घरच्यांना सांगितलं होतं. दुसऱ्या मुलांसोबत लग्नास माझा विरोध होता. त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वमर्जीने पळून गेलो, असं म्हटलं आहे. तसेच मिरचीपूड फेकल्याची जो गुन्हा दाखल केला आहे. तो खोटा असल्याचंही तरुणीने प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे. सोशल मिडीयावरून मला कळाले की, माझ्या आईने मला जबरदस्तीने माझ्या आईवर त्यांच्या हातातील लाकडी दांडके उगारून तसेच माझ्या आई व भाऊ यांच्या डोळयात मिरचीची पुड टाकून माझे अपहरण केले आहे तसेच माझ्या आईने खरेदी केलेली नथ व चांदीची अंगठी हिसकावून नेली आहे अशी खोटी व बनावट फिर्याद दिलेली आहे. सदरची फिर्याद ही माझ्या आईने कोणाच्यातरी सांगण्यावरून व कोणाच्यातरी दबावावरून खोटी व बनावट स्वरूपाची दिलेली असून आईच्या फिर्यादीमधील मजकुराप्रमाणे कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नसून मी स्वतः माझ्या राजीखुषीने व मर्जीने 1 वर्षापासून असलेल्या प्रेमसंबंधामुळे आमचा एकमेकांवर विश्वास असल्याने निघून गेली होती. मी पुर्णपणे सज्ञान असलेने मला माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, असंही तरुणीने प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे.


