अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा : दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर – भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात दि. 03/07/2026 रोजी तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटांसह वादळे, मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वा-याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच दि. 04/07/2026 रोजी अतिवृष्टीचा इशारा दिलेला असून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट” प्रसारीत करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील तमाम नागरिकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.
1) मेघगर्जनेच्या वेळी, बीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. बीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, वीजेच्या इशा-याबाबत पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांचेकडील “दामिनी ॲप” (Damini) प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावे.

2) गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे.

3) वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.

4) मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या केबल्स् पासून दूर रहावे.

5) जाहिरात फलक (होर्डिग्ज्) कोसळून होणा-या दुर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिग्ज्) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी.

6) जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये, सुरक्षित निवारास्थळी स्थलांतर करावे.

7) धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धरणाचे पाण्यात, नदीचे वा कालव्यांच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये.

8) अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणा-या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.

9) नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे.

10) नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल/बंधारे ओलांडू नये.

11) नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.

सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज, पाऊस यांपासून स्वतःचे व त्यांच्या जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय यांचेशी संपर्क साधावा. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील दूरध्वनी क्र. 0241-2323844/2356940 किंवा 112, 1077 (टोल फ्री) या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles