नगर शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत; एकाच दिवशी ३८ नागरिकांना चावा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

अहिल्यानगर शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत; एकाच दिवशी ३८ नागरिकांना चावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर यांच्या दालनात तीव्र आंदोलन

येत्या आठ दिवसांत ठोस उपाययोजना करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन – संपत बारस्कर

मोकाट कुत्र्यांचा प्रश्न विशेष बाब म्हणून महासभेत घ्या; महापौर ज्योतीताई गाडे यांना निवेदन

अहिल्यानगर : शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काल एकाच दिवशी शहरातील तब्बल ३८ नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. महानगरपालिकेकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी महापालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
ते म्हणाले की, मागील महासभेमध्ये मोकाट कुत्र्यांचा विषय मांडण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी उपाययोजना झालेली दिसून येत नाही. सर्व काम केवळ कागदोपत्री सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न विशेष बाब म्हणून पुढील महासभेच्या अजेंड्यावर घेण्यात यावा, अशी मागणी महापौर ज्योतीताई गाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नागरिकांच्या प्रश्नांसाठी लोकांना महापालिकेत आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. त्यापूर्वीच प्रशासनाने ठोस आणि परिणामकारक उपाययोजना करणे आवश्यक आहे, असेही संपत बारस्कर यांनी स्पष्ट केले.
या गंभीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर यांच्या दालनात तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिक विधाते, नगरसेवक बाळासाहेब पवार, महेश तवले, अजिंक्य बोरकर, मयूर बांगरे, वैभव ढाकणे, सुशांत जाधव, सुरज कोतकर, दीपक खेडकर, जॉय लोखंडे, सागर गुंजाळ, सुरज शिंदे, भाऊ बारस्कर, ऋषिकेश ताठे, नितीन लिगडे, रवी दंडी, आनंद राठोड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनानंतर अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करत सांगितले की, पिंपळगाव माळवी येथे मोकाट कुत्र्यांसाठी निवारण केंद्र उभारण्याचे काम सुरू असून प्रशासनाकडून तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.

एकाच दिवशी ३८ नागरिकांवर हल्ला; महापालिका आणखी मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?
शहरामध्ये काल पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत ३८ नागरिकांना चावा घेतला. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपत बारस्कर म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत तीव्र आंदोलन करून मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या व्यथा मांडणे आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवणे हे आमचे कर्तव्य आहे. मोकाट कुत्रे नागरिकांवर जीवघेणे हल्ले करत आहेत. यापूर्वीही एका निष्पाप बालकाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आणखी एखादी दुर्दैवी घटना घडण्याची वाट महापालिका पाहत आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन येत्या आठ दिवसांत प्रभावी उपाययोजना न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles