अहिल्यानगर-दरेवाडी (ता. अहिल्यानगर) परिसरातील जमीन विक्रीच्या व्यवहारात 18 जणांनी संगनमत करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सुशील श्रीकांत रानमळकर (वय 42, रा. जामखेड रस्ता, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठाने आदेश दिल्यानंतर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दरेवाडी येथील गट क्रमांक 168/2 अ ही जमीन खरेदी केली होती.
या जमिनीच्या जुन्या न्यायालयीन वादाचा गैरफायदा घेत संशयित आरोपी दत्तू बबन राहिंज, पांडुरंग बबन राहिंज, सुग्रीव विष्णू राहिंज, दुर्वास विष्णू राहिंज (सर्व रा. दरेवाडी), सुनिता कैलास शिंदे (रा. चौंडी ता. जामखेड), मनिषा गौतम राहिंज व तीन अल्पवयीन मुले (सर्व रा. माका, ता. नेवासा), आकाश पांडुरंग राहिंज, पवन पांडुरंग राहिंज, राहुल पांडुरंग राहिंज, सचिन दत्तात्रय राहिंज (सर्व रा. दरेवाडी), अजय सुरेश औसरकर, विजय दत्तात्रय करांडे, अमोल कांतीलाल मुथा, आणि गणेश शेटीबा शेलार (सर्व रा. साथसंगत) यांनी कट रचला. या संशयित आरोपींनी फिर्यादीची दिशाभूल करत सदर जमीन परस्पर बेकायदेशीरपणे विक्री केली.
या व्यवहारात संशयित आरोपींनी संगनमत करून फसवणूक केली आहे. जेव्हा फिर्यादीने या फसवणुकीबाबत संशयित आरोपींकडे विचारणा केली, तेव्हा त्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देऊन हुसकावून लावले. न्यायालयाच्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध फसवणूक, बनावटगिरी, धमकी देणे आणि संगनमत करणे यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात करीत आहेत.


