राहुरी तालुक्यातील गुहा इथल्या वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत हिंदू-मुस्लिम समाजाला धार्मिक कार्यक्रम घेण्याचा वक्फ न्यायाधिकरणाच्या मनाई आदेश औरंगाबाद खंडपीठाने निकाल देत हटवला.
यानंतर हिंदू सकल समाजाच्यावतीनं आज तिथं गुहा ग्रामदैवत कानिफनाथ यात्रा भरवण्यात आली. या यात्रेतील मुख्य आरतीला राजकीय विरोधक माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि भाजपचे अक्षय कर्डिले दोघं एकत्र, भगवे पंचे घालून आल्यानं, दोघांच्या टायमिंगची चर्चा होती. औरंगाबाद खंडपीठाने काल शनिवारी वक्फ न्यायाधिकरणाच्या मनाई आदेश हटवला. यानंतर राहुरीतील गुहा इथल्या वादग्रस्त धार्मिक स्थळावर आज ग्रामदैवत कानिफनाथ महाराज यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात झाली. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे संभाव्य उमेदवार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले आणि श्रीरामपूरचे सागर बेग यांच्या हस्ते महाआरती झाली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तनपुरे आणि भाजपचे (BJP) कर्डिले एकत्र आल्याने दोघांमध्ये कलगीतुरा रंगला. दोघांनी गळ्यात भगवा पंचा अन् डोक्यावर भगवी टोपी घालत, यात्रेला हजेरी लावली.
अक्षय कर्डिले यांनी, देवस्थान परिसरातील अतिक्रमणे काढली जातील. शिवाजी कर्डिले साहेबांनी इथं मूर्तीची आणली. आगामी काही वर्षांत भव्यदिव्य कानिफनाथ मंदिर उभारले जाईल. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.प्राजक्त तनपुरे यांनी, धार्मिक उत्सवात पक्षभेद किंवा राजकारणाचा संबंध नाही. गुहा इथल्या देवस्थानचा प्रश्न कुणीही मिटवा. परंतु एक घाव दोन तुकडे करून प्रश्न निकाली काढला पाहिजे. आमदार होण्याची अक्षय कर्डिले यांना घाई झाली आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मला आमदार होण्याची कुठलीही घाई नाही, असा टोला लगावला.छत्रपती संभाजीनगरमधील महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबादचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अदिल खान आणि वक्फ न्यायाधिकरणाचे सदस्य तथा मुस्लिम कायदा व न्यायशास्त्राचे मोहिउद्दीन मोईद यांनी धार्मिक स्थळाच्या गट क्रमांक 23मध्ये कोणतेही धार्मिक कार्यक्रम घेण्यास मनाईचा आदेश काढला. वादग्रस्त रचना सुरक्षित राहावी आणि समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी, या उद्देशाने दोन्ही पक्षांना धार्मिक कार्यक्रम करण्यास मनाईचा आदेश काढला.
सकल हिंदू समाजाकडून आवाहन
वक्फ न्यायाधिकरणाच्या या आदेशानंतर सकल हिंदू समाजाने कावड आणि आजच्या यात्रेसाठी आवाहन केलं होतं. हे मंदिर आपले असून, ते कायमचे बंद होईल. ही लढाई म्हणजे हिंदूंच्या अस्तित्त्वाची लढाई आहे, अन् माघार घ्यायची नाही, असे मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज गुहा इथं मोठा पोलिस बंदोबस्त होता.


