कर्जत: शब्द कधी जखम करतात, तर कधी समाज घडवतात. महिलांच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या शिव्यांना पूर्णविराम देण्यासाठी कोळगावच्या (श्रीगोंदे, अहिल्यानगर) महिलांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एक आगळावेगळा निर्णय घेतला. गावात कोणीही आई-बहिणींवरून शिवी दिल्यास ५०० रुपये दंडाची कारवाई करण्याचा ठराव करत महिलांनी सन्मान, स्वच्छता आणि संस्कार यांचा नवा संदेश दिला.
जागतिक महिला दिनाच्या निमित्त मौजे कोळगाव (ता. श्रीगोंदा, अहिल्यानगर) येथे ग्रामपंचायतीने आज, रविवारी विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ अंगणवाडीसेविका शकुंतला देशमुख होत्या. अध्यक्षपदाची सूचना अंगणवाडी सेविका विद्या लगड यांनी मांडली, अनुमोदन मीना भापकर यांनी दिले. ग्रामसभेची विषयपत्रिका ग्रामपंचायत अधिकारी एस. एस. कवडे यांनी वाचून दाखविली.
ग्रामसभेत गावातील शेतीसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर महिलांनी गावाच्या सामाजिक वातावरणाबाबत गंभीर चर्चा करत एक महत्त्वाचा निर्णय घेतला. गावात कोणीही आई-बहिणींवरून शिवी दिल्यास त्याचा व्हिडिओ ग्रामपंचायतीकडे सादर केल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून ५०० रुपयांचा दंड आकारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. महिलांच्या सन्मानासाठी घेतलेला हा निर्णय गावात चर्चेचा विषय ठरला आहे.
याच बैठकीत स्वच्छतेबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येकाने आपले घर, दुकान आणि परिसर स्वच्छ ठेवावा. जर कोणाच्या घराजवळ किंवा दुकानाजवळ कचरा दिसून आला आणि त्याचा फोटो ग्रामपंचायत कार्यालयात सादर झाला, तर संबंधित व्यक्तीकडून १०० रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा ठरावही करण्यात आला तसेच गावात व्यसनमुक्ती आणि महिला सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्धारही महिलांनी व्यक्त केला.
या ग्रामसभेस सरपंच पुरुषोत्तम यशवंत लगड, उपसरपंच विलास बाळासाहेब शितोळे, ग्रामपंचायत सदस्य जयराज लगड, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय (गोटू) लगड, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र रणसिंग, कल्याण आढाव, प्रशांत आढाव, ग्रामपंचायत अधिकारी एस एस कवडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील अंगणवाडी सेविका, आशासेविका आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
यावेळी सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिला सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. पुढील वर्षी महिला दिन आणखी मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात शकुंतला देशमुख यांनी महिलांच्या एकजुटीचे कौतुक करत, गावात सन्मान आणि संस्कार जपण्याचा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
आई-बहिणीवरून जो शिवी देईल, त्याला कडक शासन होईल! अहिल्यानगर जिल्ह्यातील गावाने घेतला निर्णय
- Advertisement -


