Monday, March 16, 2026

केंद्रप्रमुख भरती परीक्षेचा निकाल जाहीर…नगर जिल्ह्यासह उमेदवारांचा गुणयादीत समावेश

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. २०० गुणांसाठी झालेल्या परीक्षेत १७१ गुण मिळवलेल्या उमेदवाराने पहिला क्रमांक पटकावला आहे.
परीक्षा परिषदेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. राज्यातील समूह साधन केंद्रातील (केंद्रशाळा) समूह साधन केंद्र समन्वयकांच्या (केंद्रप्रमुख) २ हजार ४१० पदांसाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५’ ही परीक्षा ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या गुणयादीनुसार ११८ ते १७१ गुण मिळवलेल्या उमेदवारांचा या यादीत समावेश असल्याचे दिसून येत आहे. एकूण १५ हजार उमेदवारांचा गुणयादीमध्ये समावेश आहे. टीईटी, सीटीईटी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना सर्वांत पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद करण्यासाठीचा दुवा यथावकाश उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ४६ हजार ६८ शिक्षकांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. दोन सत्रांत झालेली ही परीक्षा ३८ हजार ५५९ शिक्षकांनी दिली. तर ७ हजार ५०९ शिक्षक अनुपस्थित राहिले. मात्र, या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी झाल्यामुळे निवडीसाठी चुरस होणार असल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे १५ उमेदवारांतून एका उमेदवाराची या पदासाठी निवड होणार असल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यात १५१, नाशिक जिल्ह्यात १२२, रत्नागिरी जिल्ह्यात १२५, अहिल्यानगर जिल्ह्यात १२३, रायगड जिल्ह्यात ११४ पदे उपलब्ध आहेत. त्याशिवाय अन्य जिल्ह्यांमध्येही पदे उपलब्ध आहेत. त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांचे या परीक्षेच्या निकालाकडे लक्ष लागले होते.

राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या सक्षमीकरणासाठी केंद्रप्रमुखांची पदे भरणे आवश्यक होते. मात्र, तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे ही भरती प्रक्रिया दीर्घकाळापासून रखडली होती. आता परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने बऱ्याच काळानंतर राज्यातील शाळांना केंद्रप्रमुख मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे म्हणाले, राज्यातील शाळांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी केंद्रप्रमुखांची पदे भरण्यास प्राधान्य होते. ग्रामविकास विभागाच्या सहकार्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाली. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांसाठी हा सुवर्णक्षण आहे. नवनियुक्त केंद्रप्रमुखांच्या माध्यमातन जिल्हा परिषदांच्या स्तरावरील पर्यवेक्षकीय यंत्रणा मजबूत होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles