अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

जिल्ह्यास ६ व ७ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा

नदीकाठावरील गावातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर, -: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यास ६ व ७ जुलै २०२६ रोजी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून या कालावधीत अतिवृष्टीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यास ‘येलो अलर्ट’ देण्यात आला असून संभाव्य जीवितहानी व वित्तीय हानी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिते यांनी केले आहे.

अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पर्जन्य झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा व गोदावरी नद्यांवरील धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून २७ हजार ८४७ क्युसेक, तर गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुढील पर्जन्यमानानुसार या विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठील गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मेघगर्जना, विजांचा कडकडाट अथवा वादळी वारे सुरू असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये व सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. टॉवर, ध्वजस्तंभ, विजेचे खांब, विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर), धातूचे कुंपण तसेच लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखावे. विद्युत प्रवाह असण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही वस्तूस स्पर्श करणे टाळावे. मेघगर्जना सुरू असताना विद्युत उपकरणांचा वापर शक्यतो टाळावा. घराबाहेर मोकळ्या जागेत असताना वीज चमकल्यास उकिडवे बसून दोन्ही हातांनी कान झाकावेत व डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवून जमिनीशी कमीत कमी संपर्क राहील याची काळजी घ्यावी. वादळी वाऱ्यामुळे झाडे अथवा जाहिरात फलक कोसळण्याची शक्यता असल्याने अशा धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे. तसेच ट्रॅक्टर उलटणे किंवा शेतीची अवजारे हाताळताना अपघात होणार नाहीत, यासाठी विशेष सतर्कता बाळगावी.

वादळी वारे, पाऊस अथवा गारपीट यांमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या अथवा आणण्याचे नियोजन असलेल्या शेतीमालाचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जनावरेही सुरक्षित ठिकाणी हलवावीत.

धरण, नदी अथवा कालव्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धरण, नदी अथवा कालव्याच्या पाण्यात उतरू नये. तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा छायाचित्रे काढणे टाळावे.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मदतीसाठी जवळच्या पोलीस ठाणे, तहसील कार्यालय अथवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथील दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व ०२४१-२३५६९४० तसेच ११२ व १०७७ या विनामूल्य दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने कळविले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles