अहिल्यानगर शहर दुमदुमले ;10 वर्षांनंतर पारंपरिक मार्गावर श्रीराम नवमी मिरवणूक

अहिल्यानगर शहरात श्रीराम नवमी निमित्त सायंकाळी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, गेल्या तब्बल 10 वर्षांपासून बंद असलेल्या पारंपरिक आशा टॉकीज मार्गावरून यंदा पुन्हा मिरवणूक काढण्यात आल्याने नागरिकांमध्ये विशेष आनंद व्यक्त झाला. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी आणि डीजेच्या दणदणाटाने शहर दुमदुमून गेले होते. मोठ्या संख्येने नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. तरूणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

सन 2015 मध्ये प्रथमच आशा टॉकीज मार्गे मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या वादातून दंगल उसळल्याने प्रशासनाने 2016 पासून मिरवणुकीचा मार्ग बदलून बॉम्बे बेकरी-चांद सुलताना स्कूल मार्ग निश्चित केला होता. करोना काळ वगळता याच मार्गावरून मिरवणुक काढली जात होती. मात्र, यंदा विविध संघटनांनी पुन्हा पारंपरिक मार्गावरूनच मिरवणूक काढण्याची मागणी लावून धरली होती. आमदार संग्राम जगताप यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासनाने आवश्यक अटींसह या मार्गाला परवानगी दिली. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूक मार्गावरील सर्व रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले होते, तसेच उंच इमारतींवरूनही पोलिसांची करडी नजर ठेवण्यात आली होती.

या मिरवणुकीत हिंदू राष्ट्र सेना, सकल हिंदू समाज, वास्तव कंपनी आणि श्रीराम सेना बोल्हेगाव या चार मंडळांचा सहभाग होता. शहराचे आमदार संग्राम जगताप यांची उपस्थिती मिरवणुकीत विशेष आकर्षण ठरली. डीजेच्या तालावर त्यांनी ठेका धरत नृत्य केल्याचे पाहायला मिळाले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये आणखी उत्साह निर्माण झाला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles