रोहित पवारांची काँग्रेसशी जवळीक वाढतेय का? सुप्रिया सुळेंचा रोहित पवारांना सल्ला ….

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चाही मागील काही महिन्यांपासून सुरू आहेत. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांची काँग्रेस पक्षाशी वाढत असलेली जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मुंबईत शनिवारी कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार रोहित पवार यांनी दांडी मारल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून रोहित पवार हे त्यांच्या पक्षाच्या बैठकांपासून किंवा धोरणांपासून अंतर राखत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय? असे वेगवेगळे सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केले जात आहेत.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. रोहित पवारांची काँग्रेसशी जवळीक वाढतेय का? या चर्चांवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, ‘या वयात अस्वस्थपणा असतोच. पण मी कधीही कोणाला काही सल्ला देत नाही’, असं सूचक भाष्य सुप्रिया सुळे यांनी झी २४ तास या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना केलं आहे.आमदार रोहित पवार यांना काय सल्ला द्याल? असा प्रश्न विचारण्यात आला असता, यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मी कधीही कोणाला सल्ला देत नाही. पक्षाच्या नेत्या म्हणून देखील मी कोणाला काही सल्ला देत नाही. असं आहे की वडिलांचे काहीतरी गुण आले पाहिजेत. आयुष्यात सर्वच काही बोलायचं नसतं. थोडं हात राखून पण ठेवायचं असतं”, असं सूचक भाष्य सुप्रिया सुळे यांनी केलं.

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला रोहित पवारांनी स्वत:च्या पक्षातील नेत्यांना न बोलवता ते थेट राहुल गांधींना आमंत्रित करतात. अजित पवारांचं अपघाती निधन झालं, त्याबाबतही रोहित पवार हे राहुल गांधींना जाऊन भेटले होते. तसेच रोहित पवारांनी जेव्हा शेतकऱ्यांच्या मुद्यांवर पंढरपुरमध्ये आंदोलन केलं, तेव्हा त्यांना भेटायला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गेले होते. पुण्यात राहुल गांधी यांचा छात्रो की गूंज कार्यक्रम झाला, तेव्हा त्यांच्या स्वागताचे बॅनर्स रोहित पवारांनी लावले होते. त्यामुळे रोहित पवारांची काँग्रेसशी जवळीक वाढतेय का? अशी चर्चा आहे. यावर तुमचं काय मत आहे? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला.

या प्रश्नावर बोलताना सु्प्रिया सुळे म्हणाल्या की, “आमचा पक्ष किती लोकशाही पद्धतीने चालतो ते पाहा. म्हणजे आमच्या पक्षात किती स्वातंत्र्य दिलं जातं ते बघा. पण असं आहे की एक अस्वस्थपणा हा त्या वयात असतो. एका वयानंतर हळूहळू जबाबदाऱ्या जशा वाढतात तशी मॅच्युरिटी येत असते. रोहित पवार हे तरुण आहेत. मी देखील ४० व्या वर्षी आता रोहित आहे त्यासारखीच होते. आता संसदेत माझ्यासारखं भाषण कोण करतं? भारतीय जनता पक्षाला राहुल गांधी यांच्याबरोबरीने सर्वात जास्त अंगावर कुठला पक्ष घेतो?”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles