गृहमंत्री अमित शाह तडीपार असताना बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी त्यांना मोठी मदत केली होती, असा गौप्यस्फोट शिवसेना (उबाठा) नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला. कपिल सिब्बल यांच्या ‘दिल से’ या कार्यक्रमात राऊत यांनी दिलेल्या मुलाखतीत अनेक स्फोटक खुलासे आणि गौप्यस्फोट त्यांनी केले. महाराष्ट्रातील सत्तांतर, तपास यंत्रणांचा वापर आणि त्यांचा तुरुंगातील अनुभव यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे.
“मातोश्रीच्या गेटवर अमित शाह येऊन थांबले होते. त्यांचा संदेश बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पोहोचवला जात होता. दुसऱ्या दिवशी अखेर शाह यांना बाळासाहेबांना भेटता आले. शाह त्यावेळी तडीपार होते व त्यांचे काही खटले मुंबईत सुरु होते. त्यांनी बाळासाहेबांना भेटून सर्व प्रकार सांगितला, अनेक खटले आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाचे कथन केले. व मदत करण्याची विनंती केली. बाळासाहेबांनी मनोहर जोशींना फोन करुन न्यायाधीशांना भेटून फोन करण्यास सांगितले. बाळासाहेबांनी न्यायाधीश यांच्याशी संवाद साधून अमित शाह यांना सहकार्य करण्यास सांगितले व त्यांना मदत झाली”, असे संजय राऊत यांनी सांगितले.“शरद पवार केंद्रात कृषिमंत्री होते आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. यावेळी अमित शाह यांच्याविरोधात एसआयटीची चौकशी सुरु होती. मोदींनी काही अधिकाऱ्यांशी बोलणं केलं होतं पण, एक महाराष्ट्र केडरचा अधिकारी तयार होत नव्हता. त्यावेळी मोदींंनी चौकशीतून मार्ग काढण्यासाठी शरद पवारांची मदत घेतली. पवारांनी अधिकऱ्याला सांगून त्यांना मदत केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. संकटकाळात मदत केली त्यांचेच पक्ष फोडण्याचे काम भाजपाने केले”, अशी टीका संजय राऊतांनी केली. दोन्ही किस्से संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या त्यांच्या पुस्तकातही लिहले असल्याचे ते म्हणाले.


