अहिल्यानगर – शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात एका तरूणावर चाकूने सपासप वार करत प्राणघातक हल्ला झाल्याची घटना १४ एप्रिल रोजी रात्री १०:४५ वाजता घडली. अमोल रमेश वानखेडे (वय ३५, रा. दीपनगर, रंगोली हॉटेल पाठीमागे, केडगाव) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात राहील आसिर शेख (वय २२, रा. तपोवन रोड)याच्याविरूध्द खूनाचा प्रयत्न, अॅट्रॉसिटी आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास १५ एप्रिल रोजी दुपारी अटक केली आहे.
फिर्यादी वानखेडे हे १४ एप्रिल रोजी रात्री ११:४५ वाजताच्या सुमारास माळीवाडा बसस्थानकासमोरील सारंग पान शॉपजवळून आपल्या घराकडे जात होते. यावेळी शेख याने त्यांना अडवून तू कोठून आला आहेस असा सवाल करत विनाकारण वाद घालण्यास सुरूवात केली. फिर्यादीने त्यास समजावण्याचा प्रयत्न केला असता, शेख याने त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या शेख याने तुला आता जिवेच मारतो, अशी धमकी देत आपल्याकडील चाकूने फिर्यादीवर सपासप वार केले. फिर्यादी रक्ताच्या थारोळ्यात पडले. गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीला तातडीने उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमीच्या जबाबावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक टिपरसे करीत आहेत.


