नगर-दौड रस्त्यावरील खडकी शिवारात एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ३९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सतीश सदाशिव गावडे (रा.निंबवी, ता.श्रीगोंदा) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी येथील रहिवासी सतीश गावडे हे ५ एप्रिल रोजी सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलवरून नगर-दौड रस्त्याने जात होते. खडकी गावाच्या परिसरात आले असता, समोरून भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये सतीश यांच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित अज्ञात चालक जखमीला कोणतीही मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.
याप्रकरणी मृत सतीश यांचे भाऊ सुधीर सदाशिव गावडे यांनी १५ एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चालकावर भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खरात हे करत आहेत. अपघातातील दोषी चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.


