अहिल्यानगर – बैलगाडीची पलटी झाल्याने त्याखाली दबून जखमी झालेल्या तरूण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. गणेश मधूकर चव्हाण ( वय- २८ ) असे या अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड तालुक्यातील अनेक रस्त्यांची सध्या मोठी दुरावस्था झाली आहे. याच खराब रस्त्याने शेतकऱ्याचा जीव घेतला. जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे १६ एप्रिल रोजी सकाळी नऊच्या सुमारास गणेश मधुकर चव्हाण (२८) या तरुण शेतकऱ्याचा बैलगाडी उलटून अपघाती मृत्यू झाला. गणेश आपल्या चुलत्यासोबत शेतातून बैलगाडीत चारा भरून घरी परतत असताना खैरी नदीजवळ रस्त्यातील खड्ड्यामुळे बैलगाडी अचानक उलटली. या अपघातात गणेश बैलगाडीखाली दाबला गेल्याने गंभीर जखमी झाला, तर त्याचे चुलतेही जखमी झाले. ग्रामस्थांनी त्याला तातडीने खर्डा आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी बार्शी येथे हलवले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. ऐन उमेदीच्या काळात तरुण शेतकऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने चव्हाण वस्तीवर आणि संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.


