पल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर महाराज) यांनी नागपुरातील भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यावर भाष्य केले. “शिवाजी महाराज युद्धाने थकले होते आणि त्यांनी आपले राज्य समर्थांच्या चरणी अर्पण केले,” असे विधान बागेश्वर महाराज यांनी केले. यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
जगातील पहिले भारतदुर्गा मंदिर नागपूरच्या जामठा परिसरात उभारले जाणार आहे. त्याचा भव्य शिलान्यास सोहळा नागपूरमध्ये पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात गुरुशरणानंद महाराज, स्वामी अवदेशानंद, गोविंद गिरी महाराज, साध्वी ऋतुंबरा देवी आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या हस्ते शिलान्यास झाला.बागेश्वर महाराजांनी आपल्या भाषणात दावा केला की, “छत्रपती शिवाजी महाराज समर्थांकडे गेले आणि म्हणाले की आपण खूप युद्धे लढलो, आता हे राज्य तुम्हीच सांभाळा. काही दिवस मला काहीच करायची इच्छा नाही. त्यावर समर्थांनी राज्य चालवण्याचे मान्य केले, पण ते राजांच्याच आदेशानुसार असेल असे सांगितले.”
केवळ ऐतिहासिक संदर्भच नव्हे, तर महाराजांनी उपस्थित हिंदूंना दिलेला सल्लाही वादग्रस्त ठरत आहे. “हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा आणि त्यातील एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी समर्पित करावे,” असे विधान त्यांनी केले. लोकसंख्या नियंत्रणावरून देशात राजकीय खडाजंगी सुरू असताना, एका धार्मिक व्यासपीठावरून असे आवाहन करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.


