निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या 12 मे रोजी मतदान पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिल हा शेवटचा दिवस असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये उमेदवारीवरून मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. विशेषतः अमोल मिटकरी यांनी जय पवार यांच्या नावाचा आग्रह धरल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.अमोल मिटकरी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत जय पवार यांच्या उमेदवारीला पक्षातील इतर इच्छुकांचाही पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
मिटकरींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या पक्षातील अनेक इच्छुक उमेदवारानी माझ्या मताला सहमती दाखवत मला संपर्क करून जय दादा यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दर्शविला .फक्त माझी इतकीच विनंती की लिखित स्वरुपात त्यांनी तसा तो पक्ष श्रेष्ठीना द्यावा जेणेकरून आपल्या दादांना ती खरी आदरांजली ठरेल.”दरम्यान, मिटकरींनी यापूर्वीही जय पवार यांना विधान परिषदेवर पाठवण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी कार्यकर्ते व नेत्यांच्या जवळच्या लोकांची लॉबिंग व चढाओढ पाहता आगामी काळात राज्यभर पक्ष वाढीसाठी अजितदादांसारखा विश्वासू व युवा चेहरा पुढे आणण्याची आवश्यकता आहे.
सद्यस्थिती जय पवार हे नाव या जागेसाठी सर्वोत्तम आहे. कदाचित इतरांना घराणेशाही वाटेल ते वाटू देत मात्र दादा नंतर भविष्यात हा चेहरा महाराष्ट्रासाठी दादांसारखाच आश्वासक वाटतो. दादांची उणीव भरून करण्याची क्षमता असलेला हा चेहरा राष्ट्रवादी पक्षासाठी संजीवनी ठरेल. अर्थात अंतिम निर्णय पक्षाचा असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी या आधी केलं होतं.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या या एका जागेसाठी पक्षात मोठी रस्सीखेच सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एका जागेसाठी तब्बल 70 ते 75 जण इच्छुक आहेत. यामध्ये विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांच्या नावांचीही चर्चा आहे. आता या सर्व इच्छुकांना डावलून जय पवार यांना संधी मिळणार की पक्षाकडून एखादा अनपेक्षित निर्णय घेतला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधान परिषदेवर नेमकी कुणाला संधी देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


